'त्या' पराभवाच्या निकालाची दाद मागण्यासाठी अमोल किर्तीकर ठोठावणार न्यायालयाचं दार

Amol Kirtikar : उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार अमोल किर्तीकर आता न्यायालयापुढं निवडणुकीच्या निकालाची दाद मागणार आहेत.   

सायली पाटील | Updated: Jun 15, 2024, 10:47 AM IST
'त्या' पराभवाच्या निकालाची दाद मागण्यासाठी अमोल किर्तीकर ठोठावणार न्यायालयाचं दार  title=
Shivsena thackeray group amol kirtikar to chalalnge ravindra waikars loksabha election win at court

Political News : (Loksabha election result 2024) लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, या निकालानंतर अनेक निवनिर्वाचित खासदारांनी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघाच्या अनुषंगानं महत्त्वाची कामं करत केंद्रापर्यंत नागरिकांच्या समस्या पोहोचवण्यासाठीचे प्रयत्न सुरु केले आहेत. यामध्ये मुंबईच्या उत्तर पश्चिम मतदारसंघात मात्र आजही तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. 

शिवसेना ठाकरे पक्षाचे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार अमोल कीर्तिकर न्यायालयात दाद मागणार आहेत. 4 जूनला लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी, मतमोजणी केंद्रावरील CCTV फुटेज किर्तीकरांना द्यायला जिल्हाधिकाऱ्यांनी नकार दिला. CCTV फुटेज देणं नियमात बसत नसल्याचं कारण यावेळी किर्तीकरांना देण्यात आलं. याच संपूर्ण परिस्थितीवर आता किर्तीकर थेट कायद्याची मदत घेणार आहेत. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : 'या' भागासाठी पुढचे 24 तास वादळी पावसाचे; ताशी 40-50 किमी वेगानं वारेही वाहणार 

थोडक्यात निवडणुकीच्या निकालाविरोधात किर्ती न्यायालयाचं दार ठोठावणार आहेत. (amol kirtikar vs ravindra waikar) अमोल किर्तीकर यांनी या सगळ्या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगालाही पत्र दिलं आहे. अवघ्या 48 मतांनी शिंदे पक्षाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी त्यांचा पराभव केला होता, ज्यानंतर या पराभवावरही प्रश्न उपस्थित करत वायकरांनी चुकीच्या पद्धतीचा वापर करत निवडणुकीत विजय मिळवल्याचा आरोप करण्यात आला.  

अमोल किर्तीकर यांनी मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली असता उमेदवाराला सीसीटीव्ही फुटेज देणं कायद्यात बसत नसल्याचं कारण, मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून पुढे करण्यात आल्याचं सांगितलं गेलं. दरम्यान, मतमोजणीमध्ये गोंधळ झाल्याची बाब अधोरेखित करत किर्तीकरांनी फेरमतमोजणीची विनंती निवडणूक अधिकाऱ्यांकडे करूनही त्यांची ही मागणी नाकारण्यात आली. 

वायकरांचा विजय हा मॅनेज केलेला- संजय राऊत 

दरम्यान रविंद्र वायकर यांना मिळालेला विजय मॅनेज करण्यात आला होता, अशी परखड प्रतिक्रिया देत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यंत्रणेला धारेवर धरलं होतं. काही दिवसांपूर्वी मुंबईत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये किर्तीकरांच्या परभावासाठी राऊतांनी वंदना सूर्यवंशी नावाच्या महिला अधिकाऱ्यांचं नाव घेत या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या जबबादारीवरच इतका मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी लावला होता.