महाराष्ट्राशी गद्दारी... केंद्रातील निधीवरुन संजय राऊतांची फडणवीसांवर टीका

चर्चांविषयी देवेंद्र फडणवीस यांचंही स्पष्टीकरण, म्हणे.... 

Updated: Dec 2, 2019, 11:18 AM IST
महाराष्ट्राशी गद्दारी... केंद्रातील निधीवरुन संजय राऊतांची फडणवीसांवर टीका   title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच्या भल्यामोठ्या राजकीय नाट्यादरम्यानच राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. अवघ्या ८० तासांसाठी ते पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. ज्यानंतर त्यांनी संख्याबळाअभावी या पदाचा राजीनामा दिला होता. पण, आता मात्र याविषयीची वेगळीच माहिती समोर येत आहे. 

भाजप नेते अनंत हेगडे यांच्या गौप्यस्फोटानुसार केंद्राकडून मिळालेला ४० हजार कोटींचा निधी परत करण्यासाठीच फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि हा नियधी परत दिला. फडणवीसांविषयी करण्याच आलेला हा मोठा खुलासा पाहता आता राजकीय वर्तुळातून यावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या घटनेसंबंधीची माहिती मिळतात तातडीने याविषयी ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली. अनंत हेगडे यांच्या सांगण्यानुसार ८० तासांसाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असणाऱ्या फडणवीसांनी ४० हजार कोटींची रक्कम केंद्राला परत दिली? असा संतप्त सवाल उपस्थित करत ही महाष्ट्रासोबतची गद्दारी आहे ही प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

महाविकासआघाडीचे नेते सत्तेत आल्यानंतर या निधीचा गैरवापर केला जाईल असं फडणवीसांना वाटल्यामुळे ते या निर्णयावर पोहोचल्याचं हेगडे यांनी सांगितलं. दरम्यान, सध्याच्या घडीला राजकीय वातावरणातील अनेक घडामोडींमध्ये निधी परतवण्याची ही घडामोड अनेकांना खडबडून जागं करत आहे. राट्रवादीचे नेते, प्रवक्ते नवाब मलिक यांनीही यावर आपलं मत मांडत भाजप नते लबाड असल्याचं म्हटलं आहे. निधी परत दिल्याची पडताळणी केल्याचं हे लक्षात आल्यास खुद्द पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागेल असं ते म्हणाले. 

दरम्यान, केंद्रात निधी परत देण्याच्या या चर्चांविषयी देवेंद्र फडणवीस यांचंही स्पष्टीकरण आलं आहे. त्यांनी आपल्यावर करण्यात आलेले हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. अशा पद्धतीने पैसे केंद्र सरकार थेट देत नसतं आणि ते थेट परतवता येत नाहीत, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.