मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटकेची टांगती तलवार असतानाच मातोश्रीवर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे. खासदार राजन विचारे आणि आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्या नेतृत्वात ठाण्यातील शिवसैनिकांनी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे 40 आमदार आणि 12 खासदारांनी बंड केल्यानंतर ठाण्यातील खासदार राजन विचारे हे उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी उभे राहिले. आता पहिल्यांदाच त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
दरम्यान यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ईडीच्या कारवाईचा निषेध केला आहे. संजय राऊत यांच्या घरी ईडीचे पाहुणे आले आहेत. हे निर्लज्जपणाचं कारस्थान आहे, हिंदुंमध्ये फूट पाडायची असं भाजपचं कारस्थान आहे असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शिवसेना संपवायची, शिवसेना आणि मराठी माणसाची ताकद कमी करायची. ही एकदा संपली की महाराष्ट्र यांना चरायला मोकळं कुरण मिळणार अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.
शिवसेनेपासून ठाकरे आणि ठाकरेंपासून शिवसेना हे नातं तोडायचं असा यांचा प्रयत्न सुरु आहे. पण ते तुटू शकत नाही, त्यांच्या कितीही पिढ्या उतरल्या तरी तुटू शकत नाही. पण प्रयत्न करुन बघा असं आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.
आज संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता आहे, हे कारणस्थान इतक्या निर्लजपणाने चाललं आहे, दमनशाही, दडपशाही सुरु आहे. हे कारस्थान उलथून टाकण्याची गरज आहे असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.