कृष्णात पाटील, मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारला सर्कस म्हणणाऱ्या संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना शिवसेनेनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी लडाखच्या सीमेवर काय चालले आहे याकडे लक्ष द्यावे, असं प्रत्युत्तर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी दिले आहे.
महाराष्ट्रात चांगला कारभार चालू आहे. मध्य प्रदेश आणि काश्मीरमध्ये भाजपने काय केले? आता गुजरातमध्ये ते काय करत आहेत? ती खऱ्या अर्थाने सर्कस आहे, अशी टीका खासदार अरविंद सावंत यांनी केली.
राज्यात सत्ता न मिळाल्याने भाजपच्या राज्यातील नेत्यांची तडफड दिसत होती. आता केंद्रातील नेत्यांचीही तडफड दिसत आहे, असं खासदार सावंत यांनी म्हटले आहे.
निवडणुकीनंतर शिवसेनेने सत्तेच्या लोभापोटी भाजपला धोका दिला. भाजप धोका खाईल, पण धोका देणार नाही, असं राजनाथ सिंह म्हणाले होते. त्यालाही खासदार सावंत यांनी प्रत्युत्तर दिले. शिवसेनेने धोका दिलं असं वारंवार खोटं सांगून ते गोबेल्स नीतीचा अवलंब करत आहेत. उलट भाजपनेच शिवसेनेला कित्येकदा धोका दिला आहे, असं अरविंद सावंत म्हणाले.
ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नाही असं म्हणणाऱ्यांनी आताची भाजपा अडवाणी आणि वाजपेयींची राहिली आहे का? हे सांगावे, असा टोला खासदार अरविंद सावंत यांनी लगावला.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी व्हर्च्युअल रॅलीद्वारे महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला, तेव्हा राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार आणि शिवसेनेवर टीका केली होती. ठाकरे सरकारला त्यांनी सर्कस म्हणून संबोधलं होतं. त्याला राज्यात शरद पवार यांनीही उत्तर दिलं. तर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनीही राजनाथ सिंह यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.