शिवसेना - भाजप युतीबाबत प्रस्ताव, 'या' मागण्या मान्य झाल्या तर युती!

तीन राज्यातील पराभवामुळे भाजप खचलेली असतानाच शिवसेनेनं संधी साधण्याची खेळी केलीय. युतीसाठी दोन मागण्या शिवसेनेने भाजपसमोर ठेवल्या आहेत. 

Updated: Dec 19, 2018, 06:37 PM IST
शिवसेना - भाजप युतीबाबत प्रस्ताव, 'या' मागण्या मान्य झाल्या तर युती! title=

मुंबई : तीन राज्यातील पराभवामुळे भाजप खचलेली असतानाच शिवसेनेनं संधी साधण्याची खेळी केलीय. लोकसभेसोबतच विधानसभा निवडणूक घ्यावी आणि युती करायची असेल तर सन्मानजनक जागा वाटप करा, अशा दोन मागण्या शिवसेनेने भाजपसमोर ठेवल्या आहेत. 

१५५ जागा दिल्या तरच युती होणार असल्याचा संदेश शिवसेनेने भाजपला पाठवला आहे. भाजपकडून हिरवा कंदील मिळाला नसला तरी तडजोडीचा आकडा काढण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या मागण्या पूर्ण झाल्या तरच शिवसेना भाजपसोबत युती करणार असल्याची भूमिका शिवसेनेनं घेतलीय.

सध्या भाजपकडे १२१ तर शिवसेनेकडे ६३ आमदार आहेत. दोघांचेही विद्यमान आमदार १८४ आहेत. ते वगळता १०४ जागा शिल्लक राहतात. त्यापैकी ८५ जागा शिवसेना भाजपकडे मागत आहे. परंतु त्यांची बेरीज १४८ पर्यंत जाते. 
या जागा भाजप शिवसेनेला देऊ शकत नाही. मात्र, ७५ जागा शिवसेनेला देण्यासाठी भाजप तयार आहे. त्यामुळे १३८ जागांवर शिवसेना युतीसाठी तयार होण्याची शक्यता आहे. म्हणजेच भाजपच्या वाट्याला १५० जागा येतील.
 
शिवसेना आणि भाजपमध्ये युती संदर्भात चर्चा सुरू आहे. शिवसेनेने दोन मागण्या भाजपसमोर ठेवल्या आहेत. एक म्हणजे लोकसभेसोबतच विधानसभा निवडणूक घ्यावी आणि दुसरी मागणी म्हणजे १५५ जागा द्याव्या.