मुंबई : साताऱ्यातील राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला आमदारकीचा राजीनामा सोपवला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिवेंद्रराजे हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु होती. पण त्यांनी आता राजीनामा दिल्यामुळे या बातमीला दुजोरा मिळाला आहे. शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रात हा मोठा धक्का बसला आहे. सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. पण भाजपने या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आहे.
साताऱ्यात मोदी लाटेतही पाच आमदार निवडून आले होते. याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली तरी सध्या घडत असणाऱ्या राजकीय घडामोडी आणि भाजपने शिवेंद्रराजे यांच्यासाठी तयार केलेले पोषक वातावरण यावरूनच ते स्पष्ट होतं आहे.
कार्यकर्त्यांनीही भाजपाप्रवेशाबाबत शिवेंद्रराजेंकडे आग्रह धरला होता. राष्ट्रवादी पक्षाने अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्ह्यातील विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. मात्र या मुलाखतीला आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दांडी मारली. शिवेंद्रराजे यांनी केवळ दांडीच मारली नाही तर पक्षाचा कुठलाही फॉर्म त्यांनी घेतलाही नाही. शिवेंद्रराजे राष्ट्रवादीतच राहणार असल्याचा दावा शरद पवारांनी केला होता.
भाजपकडून सातारा विधानसभेसाठी दीपक पवार इच्छुक होते. शिवेंद्रराजे यांना भाजप घेण्यासाठी आणि उमेदवार जाहीर करण्यात दीपक पवार यांची अडचण होती. मात्र भाजपने पवार यांना महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाचे अध्यक्षपद देऊन ही अडचणही दूर केल्याचं बोललं जातं आहे.
भाजप प्रवेशाबाबत शिवेंद्रराजेंकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र कार्यकर्ते आणि मतदारसंघाच्या हिताचा निर्णय घेणार असल्याचे सूचक विधान त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केलं आहे. त्यामुळे ते लवकरच भाजपमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.