Bharat Jodo Yatra : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्त्वाखाली कन्याकुमारी ते काश्मिर (Kanyakumari to Kashmir) भारत जोडो यात्रेची (Bharat Jodo Yatra) सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या या भारत जोडो यात्रेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. राहुल गांधी यांची ही भारत जोडो यात्रा मुंबईतून जाणार नाही. मात्र या यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद पाहता मुंबईतही राज्य काँग्रेसच्यावतीने भारत जोडो यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईत आयोजन करण्यात येणाऱ्या काँग्रेसच्या या भारत जोडो यात्रेमध्ये बहुतांश राजकीय पक्ष सहभागी होणार आहे. आप (AAP) आणि एमआयएम (AIMIM) वगळता इतर जवळपास सर्व राजकीय पक्ष या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार आहे. तर वंचित बहुजन आघाडी यात्रेत सहभागी करुन घेण्याबाबत अजूनही चर्चा सुरु आहे.
भारत जोडो यात्रेमध्ये कोणकोणते पक्ष सहभागी होणार ?
मुंबईत आयोजन करण्यात आलेल्या या भारत जोडो यात्रेमध्ये शिवसेनाही (Shivsena) सहभागी होणार आहे. शिवसेना पक्षाशी याबाबत चर्चा झाली असून शिवसेनेकडून मनिषा कायंदे (Manisha Kayande) या शिवसेनेच्या प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी दिली. दरम्यान भारत जोडो यात्रेला शिवसेनेने सहकार्य केल्यास दसरा मेळाव्याला काँग्रेस मदत करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असून याबाबत प्रश्न विचारला असता अशी काही एक्सचेंज ऑफर नाही. हे आंदोलन हे देशहितासाठी आहे आणि दसरा मेळावा हे शिवसेनचे बलस्थान आहे असे उत्तर भाई जगताप यांनी दिलं.
तर राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष, समाजवादी पक्ष, RPI, रिपब्लिकन पक्ष गवई गट, शेकाप पक्ष भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार आहे. मुंबई महापालिकेच्या 236 वॉर्डमध्ये आणि संपूर्ण भारतात चार महिन्यात भारत जोडो, नफरत छोडो मोहीम सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवणार असल्याचेही काँग्रेसकडून सांगण्यात आले. गांधी जयंतीच्या दिवशी म्हणजे 2 ऑक्टोबरला ऑगस्ट क्रांती मैदानातून भारत जोडो यात्रा निघणार असून विविध ठिकाणी फिरून यात्रा मंत्रालयाजवळील गांधी पुतळ्याजवळ संपणार आहे. मुंबईतील ही यात्रा एका दिवसाची असणार आहे.
याशिवाय विविध सामाजिक संस्थाही भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. सध्याची परिस्थिती ही भाजपाविरोधातील पक्षांना आपले मतभेद दूर ठेऊन एकत्र येण्याची आहे. आज लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या बटीक असल्यासारखी परिस्थिती आहे. सध्या राज्यघटना धोक्यात आहे. संसदेत आम्हाला बोलू दिले जात नाही. दिल्लीत गांधी पुतळ्याजवळ निषेध व्यक्त करणे बंद केले आहे अशी टीका भाई जगताप यांनी भाजपावर केली.