महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेकडून महिला संमेलनाचे आयोजन

दोन्ही पक्षांकडून स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी चाचपणी सुरु आहे.

Updated: Sep 9, 2019, 09:42 AM IST
महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेकडून महिला संमेलनाचे आयोजन title=

मुंबई: मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेच्या आदित्य ठाकरेंनी जनआशीर्वाद यात्रा काढली. तर आदेश बांदेकरांनी माऊली संवाद यात्रा काढली होती. यानंतर आता शिवसेनेने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांची व्होट बँक खेचण्यासाठी नव्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

'प्रथम ती' महिला संमेलन या नावाने हा कार्यक्रम होईल. याअंतर्गत २५ जिल्ह्यांमध्ये उद्यापासून सभा घेतल्या जाणार आहेत. शिवसेनेच्या २० महिला नेत्या हे संमेलन घेणार आहेत. पहिल्या टप्प्यात ९ ते ११ सप्टेंबर या कालावधीत परभणी, नांदेड, सोलापूर, औरंगाबाद, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये हे महिला संमेलन घेतले जाईल.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे हा वाद ताणला जाऊन ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युती तुटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांकडून स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी चाचपणीही सुरु झाली आहे. 

त्यासाठी शिवसेनेकडून अनेक ठिकाणी दुसऱ्या पक्षांमधून नेते आयात केले जात आहेत. तसेच पीकविमा आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारविरोधी भूमिका घेऊन शिवसेनेने वेळ पडल्यास आपण स्वबळावर लढण्यास तयार असल्याचे संकेत दिले आहेत. 

तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांकडूनही स्वबळाची भाषा करून शिवसेनेवर दबाब आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर लढल्यास पक्षाला १६० जागांवर विजय मिळेल, असा निष्कर्ष पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणात पुढे आला होता. त्यामुळे निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर शिवसेना आणि भाजप काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

२०१४ मध्ये शिवसेना आणि भाजपने ऐनवेळी युती तोडत स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. यामध्ये भाजपला सर्वाधिक १२२ तर शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या होत्या. मात्र, निवडणुकीनंतर त्यांनी एकत्रपणे सरकार स्थापन केले होते. याशिवाय, काँग्रेसला ४२ तर राष्ट्रवादीला ४१ जागांवर विजय मिळवला होता.