भाजपचे पीक जोमात, शेतकरी मात्र कोमात: शिवसेना

पंतप्रधान नरेंद्र मोदी जुन्याच आश्वासनाची 'कॅसेट' वाजवून रिकामे होतात....

Updated: Jun 22, 2018, 08:29 AM IST
भाजपचे पीक जोमात, शेतकरी मात्र कोमात: शिवसेना title=

मुंबई: भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीकेचे आसूड जोरदार ओढले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांशी संवाद नुकताच साधला. या संवादावरून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट टीका केली आहे. 'शेतकरी आपले हाल उघडय़ा डोळय़ाने बघतो आहे. या सरकारच्या राजवटीत शेतकऱयांचे उत्पन्न तर दुप्पट झाले नाही, पण शेतकऱयांच्या आत्महत्या मात्र दुपटीने वाढल्या आहेत', आसा आरोप करत  शेतकऱयांच्या आत्महत्यांचे प्रमाण का वाढतेय याचा विचार न करता मोदी सरकार पुनः पुन्हा तेच ते जुमले ऐकवत सुटले आहे. ‘जुमल्यां’च्या या ‘जुलुमा’चा स्फोट २०१९ मध्ये होईलच! असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, गेल्या चार वर्षात 'भाजपचे पीक जोमात वाढले आणि देशातील शेतकरी आणि शेतीचे क्षेत्र मात्र कोमात गेले. हे वास्तव आहे', अशी टपलीही ठाकरे यांनी केंद्र सरकारला मारली आहे.

मोदींनी शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामनामध्ये 'जुमल्यांचा जुलूम!' या मथळ्याचा लेख लिहिला आहे. या लेखात केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडाडून हल्ला चढवत ठाकरे म्हणतात,  'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशभरातील शेतकऱयांशी संवाद साधला. देशातील ६००हून अधिक जिल्हय़ांतील शेतकरी पंतप्रधानांचे भाषण ऐकत होते. शिवाय थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून करोडो शेतकरी पंतप्रधान काहीतरी ठोस आश्वासन देतील, किमानपक्षी नवीन जुमला तरी ऐकवतील अशी भाबडी आशा बाळगून टीव्हीसमोर बसले होते, मात्र त्यांचा भ्रमनिरासच झाला. ‘२०२२ पर्यंत शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करणार’, अशी गर्जना मोदी यांनी शेतकऱयांशी बोलताना केली. यात नवे ते काय? २०१४ च्या निवडणूक जाहीरनाम्यातही भारतीय जनता पक्षाने हेच आश्वासन शेतकऱयांना दिले होते. याच आश्वासनावर विश्वास ठेवून शेतकऱयांनी काँग्रेसला सत्तेतून बेदखल केले आणि भाजपचे खासदार दुपटीने वाढवून त्यांना सत्तेवर आणले. भाजपचे पीक जोमात वाढले आणि देशातील शेतकरी आणि शेतीचे क्षेत्र मात्र कोमात गेले. हे वास्तव आहे'.

जुन्याच आश्वासनाची ‘कॅसेट’ वाजवून पंतप्रधान मोकळे

शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करणार, या आश्वासनाला आता चार वर्षे उलटली. प्रत्यक्षात शेती आणि शेतकरी मात्र आहे तिथेच आणि आहे तसाच आहे. किंबहुना, पूर्वीपेक्षाही बिकट म्हणावी अशी परिस्थिती या राजवटीत झाली आहे. जी घोषणा देऊन हे सरकार सत्तेवर आले ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी म्हणजेच शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारने मागच्या चार वर्षांत काय केले आणि शेतकऱयांच्या आयुष्यात खरोखरच ‘अच्छे दिन’ आले आहेत काय हे खरेतर पंतप्रधानांनी सांगायला हवे होते, मात्र ‘शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करणार’  ही जुन्याच आश्वासनाची ‘कॅसेट’ वाजवून पंतप्रधान मोकळे झाले', असेही उद्धव ठाकरे यांनी सामनातील लेखात म्हटले आहे.