अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई : मुंबई आयआयटीच्या टेकफेस्टमध्ये पबजी गेमचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेनेने पबजी गेमच्या आयोजनाला विरोध केला आहे. पबजी गेम थांबवण्यासाठी शिवसैनिकांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.
पबजी या मोबाईल गेमचे भारतात कोट्यवधी चाहते आहेत. काहींना तर पबजीच्या नादाने वेड लागायची पाळी आलीय. असं असताना मुंबई आयआयटीच्या टेकफेस्टमध्ये पबजी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत लाखोची बक्षिसं ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय.
विद्यार्थ्यांमधील तांत्रिक कौशल्याला वाव देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केल्याचं सांगण्यात येतं आहे. तर दुसरीकडे या स्पर्धेला शिवसैनिकांनी विरोध केला आहे. तरुणांच्या मानसिकतेवर परिणाम करणारी ही स्पर्धा रद्द करावी यासाठी शिवसैनिकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतलीय.
शिवसेनेचा हा विरोध थेट आयआयटी टेकफेस्टमध्येही दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसैनिकांनी त्यांच्या स्टाईलने आंदोलन केल्यास पबजीचा व्हर्च्युअल आखाडा खराखुरा आखाडा झाल्याशिवाय राहणार नाही.