मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी (Sanjay Raut Wife) वर्षा राऊत यांची तब्बल 10 तासांनंतर ईडी चौकशी (Varsha Raut Ed Inquiry) पूर्ण झाली आहे. वर्षा राऊत यांची पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl Scam) ही चौकशी करण्यात आली. मुंबईतील ईडीच्या कार्यालयात ही चौकशी पार पडली. वर्षा राऊत आज (6 ऑगस्ट) सकाळी पावणेअकराच्या सुमाराला ईडी ऑफिसमध्ये दाखल झाल्या होत्या. (shiv sena mp sanjay raut wife varsha raut ed inquiry complet after 10 hours in patra chawl scam)
"मी ईडीला संपूर्ण सहकार्य केलं आहे. काही झालं तरी पक्ष सोडणार नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचे ऋणी आहोत", अशी प्रतिक्रिया वर्षा राऊत यांनी चौकशीनंतर माध्यमांनी दिली. तसेच ईडीने पुन्हा चौकशीसाठी बोलवलं नसल्याचंही वर्षा राऊत यांनी नमूद केलं. यावेळेस संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत आणि कुटुंबिय उपस्थित होते.
दरम्यान संजय राऊत याच प्रकरणात 8 ऑगस्टपर्यंत ईडीच्या कोठडीत आहेत. राऊत यांच्या या ईडी कोठडीवर पुढील सुनावणी ही 8 ऑगस्टला होणार आहे. त्यामुळे राऊतांना या सुनावणी दिलासा मिळणार की कोठडीत वाढ होणार, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.
मुंबईतील गोरेगावमध्ये ही पत्राचाळ आहे. या पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी प्रवीण राऊत यांच्या मेसर्स गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी पुढे आली. राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांचं पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी म्हाडासोबत कंत्राट झालं.
मात्र गुरु आशिष कन्सट्रक्शन कंपनीने भाडेकरुंसाठी आणि म्हाडासाठी सदनिका न बांधताच एकूण 9 विकसकांना तब्बल 901 कोटींना एफएसआय विकला. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीकडून मेडोज नावाचा प्रकल्प सुरु करण्यात आला. तसेच सदनिका विकण्याच्या नावाखाली 138 कोटींची माया जमा करण्यात आली.
मात्र यानंतर म्हाडाच्या अभियंत्याने याबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर ईडीची एन्ट्री झाली. ईडीने या प्रकरणात चौकशी सुरु झाली. ईडीला तब्बल 1039.79 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा ईडीला संशय आहे. त्यापैकी प्रवीण राऊत यांच्या खात्यात 100 कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले.
प्रवीण यांनी ही रक्कम आपल्या जवळचे मित्र आणि नातेवाईकांकडे ट्रान्सफर केली. या 100 कोटींपैकी 55 लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी दिल्याचं समोर आलं.