मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाचपैकी तीन राज्यातील विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली असतानाच आता शिवसेनेनेही उत्तरप्रदेशमध्ये ५० जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
भाजप ओपिनियन पोलच्या माध्यमातून अफवा पसरवत आहे. त्यावर विश्वास ठेवू नका. युपीत भाजपच्या अनेक आमदारांनी सपात प्रवेश केला. याचा अर्थ हवामानाचा अंदाज काही लोकांना आलाय. मौर्य यांना हवेचा अंदाज पटकन येतो. त्यामुळं भाजपन सावध राहावं. लाटांचे तडाखे बसायला लागलेत. सध्या मंद लाटा आहेत. पण त्या उसळू शकतात व जहाज हेलकावू शकते, अशी टीका त्यांनी भाजपवर केली.
गोवा व युपीत परिवर्तन निश्चित आहे. काल गोव्यासंदर्भात आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. गोव्यात आमचे आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू आहे. आताच वेणूगोपाळ यांच्याशी चर्चा झाली. जर काही मनाप्रमाणे नाही घडले तर आम्ही स्वबळावर लढू असे त्यांनी सांगितले.
गोव्यात महाविकास आघाडी असावी, असे सांगून ते पुढे म्हणाले. एकत्र लढलो तर गोव्यात आम्ही परिवर्तन घडवू शकतो. सेनेसारखा हिंदू विचारांचा पक्ष आघाडीत असणं चांगलं आहे. गोव्यात तृणमुलसोबत जाणार नाही. भिन्न विचारांच्या पक्षांसोबत एकाचवेळी चर्चा नाही. तसेच, जर काँग्रेसची इच्छा नसेल तर मग स्वबळावर लढू. गोव्यात भाजपचे मंत्री व आमदाराने भाजप सोडला. म्हणजे गोव्यात भाजप अभेद्य नाही, असेही राऊत म्हणाले.