दहीसर : मुंबई सत्र न्यायालयानं तत्कालीन आमदार आणि विभागप्रमुख विनोद घोसाळकर यांना शिवसेनेच्याच नगरसेविका शीतल म्हात्रेंनी केलेल्या अपमानास्पद वागणूक आणि धमकीच्या आरोपातून मुक्त केले आहे. शीतल म्हात्रे यांनी घोसाळकरांकडून मानसिक त्रास होत असल्याचा आरोप करत पक्षात बंड केलं होतं.
दहीसरमधील सार्वजनिक शौचालयाच्या भिंतींवर भ्रमणध्वनी क्रमांक लिहिल्यामुळे अनेक जण फोन करून त्रास देत असल्याचा म्हात्रेंचा आरोप होता. या सगळ्यामागे घोसाळकरांचा हात असल्याचा दावाही शीतल म्हात्रेंनी केला. त्यावेळी माजी महापौर शुभा राऊळ आणि भाजपच्या नगरसेविका मनिषा चौधरी म्हात्रेंना पाठिंबा दिला होता. याप्रकरणी घोसाळकर यांच्याविरोधात बोरीवली सत्र न्यायालयात आरोप पत्र दाखल करण्यात आलं होतं.
म्हात्रेंच्या जबाबातून गुन्हा सिद्ध होत नाही असं न्यायाधीशांनी निकालात म्हटलंय. म्हात्रेंनी एका पेक्षा जास्त जबाब नोंदवले आहेत. शिवाय साक्षीदार आणि म्हात्रेंच्या जबाबात बरीच तफावत असल्याचंही आढळून आल्याचं निकालात स्पष्ट करण्यात आलं. साक्षीदारांच्या जबाबानं म्हात्रेंचा खोटेपणा उघड होत असल्याचं न्यायाधीशांनी नमूद केले आहे.