पवारांनी आपल्या वाढदिवसाला सुप्रिया सुळेंवर सोपवली नवी जबाबदारी

लोकसभेत सर्वाधिक उपस्थिती आणि सर्वाधिक प्रश्न विचारून सुप्रिया सुळे यांनी संसदेत आपला ठसा उमटवलाय

Updated: Dec 12, 2018, 01:14 PM IST
पवारांनी आपल्या वाढदिवसाला सुप्रिया सुळेंवर सोपवली नवी जबाबदारी title=

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आणखीन एक महत्त्वाची जबाबदारी सोपवलीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संसदीय गटनेतेपदी खासदार सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात आलीय. हे पद यापूर्वी पक्षाला सोडचिठ्ठी दिलेल्या तारिक अन्वर यांच्याकडे होतं. यापुढे, पक्षाची बाजू संसदेत मांडण्याची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्याकडे असणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, लोकसभेत सर्वाधिक उपस्थिती आणि सर्वाधिक प्रश्न विचारून सुप्रिया सुळे यांनी संसदेत आपला ठसा उमटवलाय. 

तसंच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संसदीय गटाच्या उपनेतेपदी धनंजय महाडिक यांची नियुक्ती करण्यात आलीय. सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत... तर त्यापूर्वी सुळे यांची राज्यसभेवरही निवड झाली होती.

शरद पवारांची पंतप्रधानांवर टीका

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. आज पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी मंगळवारी पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालावरही प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शोभा राखली पाहिजे. ऑगस्टा प्रकरणात कुणालाही पकडून आणता आणि धमक्या देता... हे त्या पदावरील व्यक्तीला शोभत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कालच्या निकालावर बोलताना केली. मोदींबद्दल लोकांची नाराजी मतांमधून व्यक्त झाली आहे. देशातल्या संस्थांवर झालेला हल्ला लोकांना पटला नाही. देशात सध्या काळजी करण्यासारखं वातावरण आहे. भाजप सरकारच्या कामाबद्दल जनता नाराज आहे. चार वर्षांपूर्वी त्यांनी दिलेली आश्वासनं काही पूर्ण केलेली नाहीत. एका कुटुंबाविरुद्ध त्यांनी सतत प्रचार केला. त्यांनी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी किंवा राजीव गांधींना पाहिलं नाही. फक्त गेल्या दहा वर्षांच्या कामावर सतत टीका केली. त्यांनी सोनिया आणि राहुल गांधींना लक्ष्य केले. ते लोकांना पटलं नाही.