एक्झिट पोलच्या अंदाजानंतर शेअर बाजारात मोठी उसळी; सेन्सेक्स ८८८ अंकांनी वधारला

मोदी सरकार बहुमताने सत्तेत आल्यास आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम पुढे सुरु राहील.

Updated: May 20, 2019, 10:24 AM IST
एक्झिट पोलच्या अंदाजानंतर शेअर बाजारात मोठी उसळी; सेन्सेक्स ८८८ अंकांनी वधारला title=

मुंबई: लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर जाहीर झालेल्या मतदानोत्तर चाचण्यांच्या (एक्झिट पोल) अंदाजानंतर सोमवारी भांडवली बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली. आज बाजार उघडल्यानंतर भांडवली बाजाराच्या सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशकांनी मोठी झेप घेतली. सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स ८८८.९१ अंकांनी वधारून ३८,८१९.९१ वर जाऊन पोहोचला आहे. तर निफ्टी २८८ अंकांनी वधारून ११,६९१.३० च्या पातळीवर जाऊन पोहोचला. त्यामुळे भांडवली बाजाराने एकप्रकारे मोदी सरकार पुन्हा सत्तेत येणार, या निर्णयाचे स्वागत केल्याचे मानले जात आहे. मोदी सरकार बहुमताने सत्तेत आल्यास आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम पुढे सुरु राहील. त्यामुळे उद्योगांच्यादृष्टीने स्थिर आणि अनुकूल वातावरण निर्माण होईल, असा अनेकांचा अंदाज आहे. 

लोकसभा निवडणुकीचे सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान रविवारी पार पडले. यानंतर प्रथेप्रमाणे विविध संस्थांकडून निकालपूर्व चाचण्यांचे (एक्झिट पोल) निकाल जाहीर करण्यात आले. यापैकी जवळपास सर्वच एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार पुन्हा एकदा सत्तेत येण्याची शक्यता आहे. निवडणुकीपूर्वी विरोधकांकडून एनडीएला यंदा बहुमताचा आकडा गाठता येणार नाही, असा दावा केला जात होता. त्यामुळे त्रिशंकु परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र, एक्झिट पोलचे अंदाज समोर आल्यानंतर हे सर्व दावे फोल ठरले आहेत. 

देशातील प्रमुख एक्झिट पोलचा अंदाज

* टाइम्स नाऊ – व्हीएमआर: एनडीए – ३०६, यूपीए- १३२, अन्य – १०४
* इंडिया न्यूज – एनडीए- २९८, यूपीए- ११८, अन्य – १२७

* रिपब्लिक टीव्ही या इंग्रजी वृत्तवाहिनीने दोन एक्झिट पोल केले आहेत. यातील एक एक्झिट पोल सीव्होटर तर दुसरा एक्झिट पोल ‘जन की बात’चा आहे. त्यानुसार
रिपब्लिक टीव्ही- सीव्होटर : एनडीए- २८७, यूपीए – १२८, अन्य – १२७
रिपब्लिक टीव्ही – जन की बात: एनडीए- ३०५, यूपीए- १२४, अन्य – ८७

* एनडीटीव्ही: एनडीए- ३००, यूपीए- १२७, अन्य – ११५
* आयएएनएस- सी व्होटर: भाजप- २३६, काँग्रेस – ८० एनडीए- २८७
* नेता- न्यूज एक्स: एनडीए- २४२, यूपीए – १६४, अन्य – १३६
* न्यूज १८ : एनडीए- २९२- ३१२, यूपीए – ६२- ७२
* एबीपी – नेल्सन : एनडीए – २६७, यूपीए – १२७, अन्य १४८ (भाजप – २१८, काँग्रेस ८१)