संजय राऊत दिल्लीला जाऊन घेणार सोनियांची भेट

शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापनेसाठी प्रयत्न सुरू केलेत

Updated: Nov 10, 2019, 09:45 PM IST
संजय राऊत दिल्लीला जाऊन घेणार सोनियांची भेट  title=

कृष्णात पाटील, झी २४ तास, मुंबई : तुमच्याकडे बहुमताचा आकडा असेल तर संख्याबळ सादर करा, अशी विचारणा राज्यपालांनी शिवसेनेकडे केल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग घेतलाय. बहुमत नसल्यानं सत्तास्थापनेसाठी भाजपानं राज्यपालांकडे असमर्थता व्यक्त केल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष शिवसेनेवर केंद्रीत झालंय. शिवसेनेनंही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापनेसाठी प्रयत्न सुरू केलेत. याचाच एक भाग म्हणून शिवसेनेकडून ज्येष्ठ नेते संजय राऊत काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना होणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या अर्थात सोमवारी सकाळी प्रथम संजय राऊत 'सिल्व्हर ओक'वर जाऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतील. त्यानंतर ते सोनियांना भेटण्यासाठी दिल्लीला रवाना होतील. प्रथम काँग्रेसकडून हिरवा कंदिल मिळाल्यास शिवसेना राष्ट्रवादीसोबत वाटाघाटीच्या चर्चेला सुरुवात करण्याची शक्यता आहे. त्यानंतर केंद्रात सत्तेतून बाहेर पडायचं किंवा नाही? यावर शिवसेना निर्णय घेईल. 

सत्तास्थापनेसाठी भाजपानं असमर्थता दर्शवल्यानंतर आता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी विचारणा केलीय. सोमवारी रात्री ८ वाजेपर्यंत बहुमताचं संख्याबळ सादर करण्याचा निरोप राज्यपालांनी शिवसेनेकडे पोहचता केलाय. दरम्यान, मातोश्रीवर हालचाली वाढल्याचं दिसून येतंय. नुकतेच, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर हे तातडीनं मातोश्रीवर दाखल झालेत. 

यापूर्वी, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण या राज्यातील काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेऊन शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत चर्चा केली होती. सोनिया गांधी यांनी यासाठी तयारी दर्शवली नसली तरी सध्या जयपूरमध्ये असलेल्या काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. 

त्यामुळे आता, राज्यात सत्तास्थापनेसाठी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार का? दोन पूर्णपणे भिन्न विचारधारा एकत्र येणार का? की काँग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.