मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महाविकासआघाडीतल्या तिन्ही पक्षांमध्ये नाराजांची संख्या वाढली आहे. मंत्रिपद न मिळणं हे माझ्यासाठी धक्कादायक होतं, असं वक्तव्य शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केलं होतं. भास्कर जाधव यांच्या या वक्तव्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'शब्द दिला असता तर तो पाळला असता. अनेक लोकं बाहेरच्या पक्षातून आले. त्यांना उमेदवारी देऊन जिंकून आणलं. तुम्ही तुमचा पक्ष सोडलात, कारण तुम्हाला तिकडे जिंकून यायची खात्री नव्हती. युतीचे वारे होते म्हणून तुम्ही आलात. तुमचा मान सन्मान राखला गेला आणि ज्यांना शब्द दिला होता, त्या अपक्षांना मंत्री केले,' असं संजय राऊत म्हणाले.
भाऊ सुनील राऊत यांना मंत्रिपद न मिळाल्याने संजय राऊत नाराज आहेत, अशा बातम्याही प्रसिद्ध होत आहेत, पण शिवसेनेतील नाराजीच्या बातम्या या फक्त मीडियातच आहेत. यापूर्वी अनेकांनी मंत्रिपदं भूषवली आहेत. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणी येत नाही. कधी कधी दुसऱ्यांसाठी रस्ता मोकळा करायचा असतो, आमच्या पक्षात तशी परंपरा आहे, असं राऊत यांनी सांगितलं.
महाविकासआघाडीच्या खातेवाटपाबाबतही राऊत यांनी भाष्य केलं आहे. कुरबुरी फार नाहीयेत. विस्तार झाला आहे आज खातेवाटप होईल. तिन्ही पक्षाचे सरकार आहे, मोठे तालेवार लोकं मंत्रिमंडळात आहेत. काँग्रेसकडे असलेले महसूल खातं हे ग्रामीण भागाशी निगडीत आहे. आरोग्य खातंही तसंच आहे. प्रत्येक खातं हे शहरी ग्रामीण भागाशी संपर्क ठेवणारं असतं, असं राऊत म्हणाले.
एकनाथ खडसे यांच्याबाबतही राऊत यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. खडसे आणि गुलाबराव पाटील यांचा जास्त संपर्क झाला असेल, कारण ते एकाच जिल्ह्यातील आहेत. खडसे उद्धव ठाकरेंनाही भेटले होते. नक्कीच राजकीय चर्चा झाली असेल, असं विधान राऊत यांनी केलं.