संभाजीराजेंची तब्येत बिघडली! मराठा समाज आक्रमक, राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं

संभाजीराजेंची शुगर, ब्लडप्रेशर कमी झालं, पण उपोषणावर ठाण, समन्वयक-मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा निघणार का याकडे लक्ष

Updated: Feb 28, 2022, 01:25 PM IST
संभाजीराजेंची तब्येत बिघडली! मराठा समाज आक्रमक, राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं title=

Maratha Reservation :  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. संभाजीराजे यांच्या शरीरातील शुगरचं प्रमाण कमी झालंय. त्यांना अशक्तपणा, डोकेदुखीही जाणवतेय. कुठलीही औषधं घेण्यास संभाजीराजेंनी नकार दिलाय. आणखी प्रकृती बिघडली तर रुग्णालयात दाखल करावं लागले असं डॉक्टरांनी सांगितलंय. 

दरम्यान 18 मराठा समन्वयक आणि 2 विद्यार्थी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत मराठा आरक्षणासंदर्भात होणाऱ्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि एकनाथ शिंदेंसह काही महत्वाचे नेते उपस्थित आहेत. या बैठकीत 22 पैकी 5 मागण्या मान्य करून घ्याव्या असं आवाहन संभाजीराजेंनी केलं आहे. 
 
समन्वयकांनी तोडगा काढण्यासाठी कायदा हाती घेऊ नये. तिथे आवाजही चढवू नये असं आवाहन संभाजीराजेंनी केलंय. त्यामुळे आता चर्चेतून काय तोडगा निघतो याकडे लक्ष लागलंय. 

कोल्हापुरात रास्तारोको
कोल्हापुरातील दसरा चौकात रस्तारोको आंदोलन करण्यात आलं आहे. खासदार संभाजीराजे यांची प्रकृती खालावल्याने सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. सरकारने मराठा समाजाच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अशी आंदोलकांची आक्रमक भूमिका आहे.  मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा बुधवारी कोल्हापूर बंदची हाक सकल मराठा समाजाने दिली आहे. 

पुण्यात महादुग्धाभिषेक
खासदार संभाजीराजेंच्या उत्तम आरोग्यासाठी पुण्यातील राजगुरुनगर इथे सिद्धेश्वर मंदिरात महादुग्धाभिषेक करण्यात आला. प्रार्थनाही करण्यात आली. भाजपचे नेते अतुल देशमुख आणि इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. मराठा आरक्षणासाठी संभाजी राजेंनी सुरु केलेल्या उपोषण आंदोलनाला ग्रामीण भागातुन पाठिंबा मिळतोय.  

नांदेड-हैदराबाद रोडवर आंदोलन
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेड-हैद्राबाद रोडवर आंदोलन करण्यात आलं. मारतळा ते कापशी रोडवर टायर जाळण्यात आले. नांदेडमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन चिघळण्याची चिन्हे आहेत. काही ठिकाणी हिंसक पडसाद उमटतायेत. छत्रपती संभाजीराजे यांच्या उपोषण आंदोलनाला आंदोलन कार्यकर्त्यांनी पाठींबा दिला. 

पंढरपुरमध्ये बंद पुकारला
छत्रपती संभाजीराजेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पंढरपुरातल्या मोडनिंबमध्ये बंद पुकारलाय. संभाजीराजेंच्या उपोषणानंतर याचे राज्यभरात पडसाद उमटायला लागलेयत. पुणे सोलापूर महामार्गावरची मोठी बाजारपेठ मोडनिंब बाजारपेठ बंद ठेवलीय. 

मनमाडमध्ये आमरण उपोषण
मनमाडमध्ये मराठा क्रांती मोर्चा आणि अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आमरण सुरू केलं आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. पोलिसांनी उपोषणाकर्त्याना बळाचा वापर करून उपोषणाचा सांगता करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे