स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : अवघ्या काही रुपयांसाठी एका महिलेने आपल्या पोटच्या बाळाला विकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत उघडकीस आली आहे. याप्रकरणी नेरुळ पोलिसांनी सापळा रचत बाळाच्या आईसह पाच जणांना अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
मुंबईतील मालाड इथं रहाणाऱ्या एका महिलने मध्यस्थींच्या मदतीने आपल्या अवघ्या दहा दिवसाच्या बाळाला अडीच लाख रुपयांमध्ये विकण्याचा प्रयत्न केला. आरोपी महिलेचं नाव जरीना शेख असून जरीनाला याआधी चार मुलं आहेत. नुकतंच तिला पाचवं अपत्य झालं. पैसे मिळवण्यासाठी तिने आपल्या 10 दिवसांच्या बाळाला विकण्याची तयारी केली.
याबाबतची माहिती जरीनाने कल्याण इथल्या अनिता साष्टे आणि शुभम साष्टे यांना दिली. त्यांनी करावे गाव इथल्या ज्योती खान आणि तिचा पती शाहरुख खान यांना ग्राहकांचा शोध घेण्यास सांगितलं.
असा लागला प्रकरणाचा छडा
ज्योती खान यांनी उलवे इथं राहणाऱ्या अमृता गुजर या महिलेशी संपर्क साधला. या महिलेला मुल नसल्याने ज्योती खान हिने अडिच लाख रुपयात 10 दिवसांचं बाळ विकत घेण्याची ऑफर दिली. पण अमृता गुजर यांनी याबाबतची माहिती एनआरआय पोलिसांनी दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरिक्षक रविंद्र पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपींना अटक करण्यासाठी सापळा रचला.
बाळाच्या विक्रीसाठी उलवे भागात येणार असल्याचं मध्यस्थींनी अमृता गुजर यांना सांगितलं. पण नंतर त्यांनी नेरुळ रेल्वे स्टेशन येण्यास सांगतिलं. या ठिकाणी चौघं मध्यस्थी आणि महिला आपल्या बाळासह आली. अमृता गुजर यांनी एका लिफाफ्यामधून अनिता साष्टे आणि ज्योती खान यांना रोख रक्कम दिली. यावेळी सापळा रचून बसलेल्या पोलिसांनी तात्काळ पाचही जणांची धरपकड केली.
या सर्वांविरोधात बाळाची विक्री केल्याप्रकरणी तसंच बाल न्याय अधिनियमानुसार गुन्हा दाखल करुन पाचही जणांना अटक केली.