...आणि राष्ट्रवादीचे आमदार 'हेमंत करकरे' बनून विधानसभेत दाखल झाले

राष्ट्रवादीच्या या आमदार महाशयांनी आजचा दिवस चांगलाच गाजवला

Updated: Jun 26, 2019, 02:19 PM IST
...आणि राष्ट्रवादीचे आमदार 'हेमंत करकरे' बनून विधानसभेत दाखल झाले title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये आज विधानसभेत हेमंत करकरे यांच्या वेशात दाखल झाले. पोलिसांच्या वेशात आमदार गजभिये आल्यामुळे सुरक्षा रक्षकांनी त्यांना हटकलं. त्यावरून चांगलात राडा झाला. 'करकरेंना प्रज्ञा मारू शकत नाही' असा संदेश देणारा फलक गजभिये यांनी यावेळी फडकवला. पोलिसांनी अडवल्यानंतर 'हेतू साध्य झाला' असं म्हणत अखेर फोटोसेशन करून गजभिये तिथून निघून गेले. 


राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये

 

लोकसभा निवडणूक २०१९ च्या प्रचाराच्या रणधुमाळीत, मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी 'करकरे यांनी मला विनाकारण मालेगाव बॉम्बस्फोटात गोवले. त्यांनी मला प्रचंड यातना दिल्या. त्यांचा मृत्यू त्यांच्या कर्मामुळेच झाला. मी त्यांना तुमचा सर्वनाश होईल, अशा शाप दिला होता. तो अखेर खरा ठरला', असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर देशभरातून टीका झाली. यावर, भाजपालाही 'ते साध्वी प्रज्ञा यांचे वैयक्तिक मत आहे. आम्ही आजदेखील हेमंत करकरे यांना शहीदच मानतो' असं पत्रक प्रसिद्ध करावं लागलं होतं. 

भाजपच्या उमेदवार आणि सद्य नवनिर्वाचित खासदार साध्वी प्रज्ञा भाजपच्या तिकीटावर भोपाळ लोकसभा मतदार संघातून निवडून आल्या आहेत.