मुंबई : महानगर क्षेत्रातील रिक्षा, टॅक्सी सेवांसाठी किमान भाडेदरात एक रुपयांची वाढ सुचविणारा खटुआ समितीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यामुळे भाडेवाढीचे संकेत मिळत आहेत.
रिक्षा, टॅक्सी, अॅप आधारित टॅक्सी सेवेसाठीचे दरांपासून अन्य सोयी, सुविधा, सूचना आदींचा समावेश असणाऱ्या अहवालात अॅपआधारित टॅक्सी सेवांतील चढ्या दरांवरही अंकुश ठेवण्याची सूचनाही या अहवालात करण्यात आलेय.
हा अहवाल परिवहन विभागाने प्रसिद्ध केला असून राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतरच त्याची अमलबजावणी होणार आहे.
मुंबई महानगर क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या रिक्षा, टॅक्सी, अॅपआधारित टॅक्सी सेवांसंदर्भात सुचविण्यात आलेल्या खटुआ अहवालात रिक्षाचे भाडे किमान १८ रुपयांवरुन १९ रु. तर टॅक्सीचे भाडे किमान २२ यवरुन २३ रुपये इतके सुचविले आहे.
रिक्षा, टॅक्सींचे भाडेदर सूत्र, वाढ ठरविण्यासाठी बी.सी. खटुआ यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नेमली होती. या समितीने ३०० पानी अहवाल सादर करत अनेक सूचना केल्या आहेत.
रिक्षाचे भाडे ऑगस्ट २०१४ मध्ये किमान भाडे १५ रुपयांवरून १७ रु., टॅक्सीचे भाडे १९ वरून २१ रुपये झाले होते. १ जून २०१५ पासून रिक्षाचे भाडे १७ वरून १८ रुपये आणि टॅक्सीचे भाडे २१ रुपयावरुन २२ रुपये झाले.