कोरोनाचा असाही साईड इफेक्ट; नोकरदार महिलांचा व्याप वाढला

अनेक सोसायट्यांनी ३१ मार्चपर्यंत बाहेरच्या लोकांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. 

Updated: Mar 18, 2020, 08:36 PM IST
कोरोनाचा असाही साईड इफेक्ट; नोकरदार महिलांचा व्याप वाढला title=

मुंबई: सकाळी उठा, भरभर आवरा आणि कामासाठी पळा, यानंतर घरची राहिलेली कामं कामवाली बाई करेल, असा आपल्याकडील अनेक महिलांचा दिनक्रम असतो. मात्र, कोरोनामुळे महिलांच्या या वेळापत्रकाचे तीनतेरा वाजले आहेत. याचे कारण म्हणजे काही सोसायट्यांनी कोरोनामुळे कामवाल्या बायांनाच प्रवेशबंदी केली आहे. 

कोरोनामुळे अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले आहे. यामुळे नवरा-बायको आणि संपूर्ण कुटुंब घरीच आहे. मात्र, सोसायट्यांनी कामवाल्या बायकांना प्रवेशबंदी केल्याने रोजचे काम आटपायचे कसे, असा प्रश्न अनेक जोडप्यांसमोर उभा ठाकला आहे. अनेक सोसायट्यांनी ३१ मार्चपर्यंत बाहेरच्या लोकांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आणखी काही दिवस महिलांना कामाची दुहेरी कसरत करावी लागणार आहे. मात्र, कोरोनाला रोखण्यासाठी हेदेखील करू, अशी समजुतीची भूमिका काही महिलांनी घेतली आहे. यामुळे अगदी आठवड्याची सुट्टीही न घेणाऱ्या कामवाल्या बाईला वर्क फ्रॉम होमची सुविधा मिळालीय.

कोरोनाचे सावट : राज्य सरकारचा मोठा निर्णय, कार्यालयात ५० टक्के उपस्थिती

दरम्यान, राज्य सरकारने बुधवारी 'वर्क फ्रॉम होम'ची अंमलबजावणी न करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला. मुंबईला कोरोना व्हायरसच्या स्टेज ३ मध्ये घेऊन जायचं नसेल तर काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांनी ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉर्म होम करण्यास सांगावे, असे सरकारी निर्देश आहेत. या नियमाची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कलम १८८ अंतर्गत दंडाची कारवाई होऊ शकते. पुढील १-२ दिवसांत कंपन्यांमध्ये भेट देऊन याबाबत चेकिंग होणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी यांनी दिली.