'आम्हाला 20 कोटी द्या, अन्यथा...', मुकेश अंबानींना धमकीचा ई-मेल, 'आमच्याकडे बेस्ट शूटर्स आहेत'

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ई-मेलच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली असून, 20 कोटींची मागणी करण्यात आली आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 28, 2023, 10:34 AM IST
'आम्हाला 20 कोटी द्या, अन्यथा...', मुकेश अंबानींना धमकीचा ई-मेल, 'आमच्याकडे बेस्ट शूटर्स आहेत' title=

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुकेश अंबानी यांना ई-मेलच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जर तुम्ही आम्हाला 20 कोटी दिले नाहीत तर तुम्हाला ठार मारु असं या ई-मेलमध्ये लिहिण्यात आलं आहे. मुकेश अंबानींच्या सुरक्षा प्रमुखाने यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांना तक्रार दाखल करुन घेत तपास सुरु केला आहे.

धमकीच्या ई-मेलमध्ये लिहिण्यात आलं आहे की, "जर तुम्ही आम्हाला 20 कोटी दिले नाहीत, तर आम्ही तुम्हाला ठार करु. आमच्याकडे भारतातील बेस्ट शूटर्स आहेत". पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 ऑक्टोबरला हा ई-मेल पाठवण्यात आला आहे. ई-मेल पाठवणाऱ्याचं नाव शादाब खान आहे. मुकेश अंबानी यांचं मुंबईतील निवासस्थान अँटिला येथील सुरक्षा प्रमुखाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.  याप्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे. 

मुंबई पोलिसांनी गतवर्षी मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला धमकी देत टार्गेट करणाऱ्या बिहारमधील एका व्यक्तीला अटक केली होती. या व्यक्तीने मुकेश अंबानी यांचं निवासस्थान अँटिला आणि एच एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय उडवून देण्याची धमकी दिली होती.