मुंबई : देशभरात कोरोनाविरुद्धचा हा सामना, लढा जिंकण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. या सामन्यातील जण प्रत्येक आपली कामगिरी चोख पार पाडत आहे. आता या सामन्यात खेळाडूंनीही सहभाग घेतला आहे. वसई-विरारमध्ये होणाऱ्या रक्तदान शिबिरात रणजी खेळाडूंनी सहभाग घेत कोरोना रुग्णांसाठी रक्तदान केलं आहे. त्यांच्या सहभागामुळे नागरिकांमध्येही उत्साहाचं वातावरण असून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत ९१ खेळाडूंनी रक्तदान केलं आहे.
विवा महाविद्यालय, साईनाथ स्पोर्ट्स क्लब, अवर्स क्रिकेट क्लब यांनी जे. जे. रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने वसई-विरारमध्ये रक्तदान शिबीर आयोजित केलं आहे. साईनाथ स्पोर्ट्स क्लब आणि अवर्स क्रिकेट क्लब या दोन्ही संस्था मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न आहेत. कोरोनाच्या महामारीमुळे सध्या रक्ताचा प्रचंड तुटवडा असून तो भरून काढण्यासाठी हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं. यात विवा महाविद्यालयाने पुढाकार घेतला आहे.
या रक्तदान शिबिरात वसई-विरारमधील ९० हून अधिक खेळाडूंनी आपलं योगदान दिलं. यात विनायक भोईर आणि रॉयस्टन डियाझ या रणजी खेळाडूंचाही समावेश आहे. त्याशिवाय २५०हून अधिक कुटुंबांनी यात हातभार लावला आहे. त्याशिवाय मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनीही या शिबिरात सहभाग घेतला. विवा महाविद्यालयाजवळ आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबीरात सोशल डिस्टंसिंगची संपूर्ण काळजी घेतल्याचं रक्तदात्यांकडून सांगण्यात आलं.
९१ खेळाडूंसह अनेक क्रिकेटप्रेमीनीं सहभाग घेत २५० हून अधिक बाटल्या रक्त या शिबिराच्या माध्यमातून गोळा करण्यात यश आलं. हा आकडा मागणीच्या तुलनेत लहान असला, तरी कोरोनाविरोधी लढ्यात वसई-विरारकरांचं हे योगदान असल्याची प्रतिक्रिया आमदार क्षितीज ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.