मुंबई : राज्याच्या राजकारणात आता आणखी एका नव्या घराण्याचा प्रवेश होऊ घातला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांचे चिरंजीव जीत (वय वर्षे १२) यास राजकारणात उतरवण्याचे ठरवले आहे. आठवले केवळ ठरवूनच थांबले नाहीत. तर, त्यासाठी त्यांनी बाल शाखेचीही निर्मिती केली आहे.
मुलगा जीत यास राजकारणात उतरविण्यासाठी आठवले यांना इतकी घाई झाली आहे की, ते त्याच्या वयाची १८ वर्षे पूर्ण होईपर्यंतही वाट पहायला तयार नाहीत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने(A)दिलेल्या माहितीनुसार पूर्व मुंबईच्या चेंबुर विभागातून जीत याच्या देखरेखेखाली बालशाखेची निर्मीत करण्यात आली आहे.
विशेष असे की, जीतने पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांचीही नियुक्ती केली आहे. जीतच्या शाखेतील सर्व अधिकारी ही लहान मुलेच आहेत. दरम्यान, जीतची ही बालशाखा नेमकी कोणत्या प्रकारचे काम करेन हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.
रामदास आठवले (वय ५७) हे केंद्रीय मंत्रिमडळात सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते राज्यसभेचे खासदार आहेत. मात्र, याआधी त्यांनी पढरपूर मतदारसंघातून विजयी होत लोकसभेत प्रतिनिधीत्व केले आहे.