मदत करताना चमकोगिरी करणाऱ्यांना राज ठाकरेंच्या कानपिचक्या

चमकोगिरी करणाऱ्यांचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कान टोचले आहेत. 

Updated: Apr 14, 2020, 04:01 PM IST
मदत करताना चमकोगिरी करणाऱ्यांना राज ठाकरेंच्या कानपिचक्या title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले आहे. देशभरात २४ मार्चला सुरु झालेले लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. लॉकडाऊनच्या काळात गरिब, अबाल वृद्धांचे खायचे हाल होताहेत. यावेळी मदतीचा ओघ देखील येतोय. पण काहीजण मदत करताना कॅमेराकडे पोझ देऊन फोटो काढतात. असे अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अशा चमकोगिरी करणाऱ्यांचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कान टोचले आहेत. 

महाराष्ट्र भीषण परिस्थितीतून जात असताना गोरगरिबांना मदत करणाऱ्या सर्व मंडळींचे राज ठाकरे यांनी आभार मानले. त्यातले काही मोजके जणं कॅमेऱ्याकडे बघून मदतकार्याची छायाचित्रं काढणे, ज्याला मदत दिली जात आहे त्याला कॅमेऱ्यात बघण्यास सांगणे किंवा गॉगल लावून मदतकार्य करतानाची छायाचित्रं काढणे अशी बाब निदर्शनास आली असून या चुकीच्या गोष्टी असल्याचे राज ठाकरेंनी बजावले आहे. 

प्रत्येक माणूस हा स्वाभीमानी असतो. त्याला अशा मदतीची अपेक्षा नसते. सध्याची परिस्थिती बिकट आहे. म्हणून त्यांना सहाय्याची गरज आहे. अशा वेळेस त्याची छायाचित्रं काढून त्याची मान शरमेने खाली घालणं कितपत योग्य आहे? तसंच मदतकर्त्याने देखील कॅमेऱ्यात बघत फोटो काढणं हे देखील सुद्धा योग्य आहे का? असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला आहे.

कलेतून अभिवादन 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मनसे नेते अमित ठाकरे यांनी कलेतून अभिवादन केले आहे. त्यांनी बाबासाहेबांचे रेखाटलेले चित्र फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केले आहे.  शिका, संघटित व्हा, संघर्ष करा ! हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिला असून क्रांतिसूर्य यांना विनम्र अभिवादन..!! असे त्यांनी पुढे म्हटले आहे.