मुंबई : आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnriman Sena) 'मराठीत करा स्वाक्षरी' ही मोहिम सुरू केली होती. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र तरीही मनसे आणि राज ठाकरेंनी (Raj Thackeray on Government and Marathi Bhashan Din) हा कार्यक्रम केला. हा कार्यक्रम शिवाजी पार्क येथे पार पडला. यावेळी राज ठाकरेंनी मराठीत स्वाक्षरी केली. मराठी भाषा जपण्यासाठी हे पाऊल उचलायलाच हवे. 'सगळ्यांनीच सगळ्या ठिकाणी मराठीत स्वाक्षरी करा', असा सल्ला राज ठाकरेंनी दिला आहे.
सरकारच्या कार्यक्रमांना गर्दी होते ते चालतं पण शिवजंयती आणि मराठी भाषा दिनाच्या दिवसाला परवानगी नाकारता, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विचारला आहे. तसेच कोरोनाची एवढी भीती वाटते तर मग निवडणुका पुढे ढकला? असा सल्ला देखील राज ठाकरेंनी यांनी दिला आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता पत्रकारांनी आपण मास्क का घालत नाही? असा सवाल विचारला त्यावर राज ठाकरे म्हणाले,'मी मास्क कधीच घालत नाही. तुम्ही पण नका घालू', असा सल्ला पत्रकारांना दिला.
या कार्यक्रमाला मराठी कलाकार देखील उपस्थित होते. यावेळी अभिनेते संजय मोने, अभिनेत्री सायली संजीव, दिग्दर्शक -गायक अवधुत गुप्ते, अभिनेता अतुल परचुरे यासारखे कलाकार उपस्थित होेते. या कलाकारांनी देखील येथे मराठी स्वाक्षऱ्या केल्या.