Raj Thackarey : राज ठाकरे यांना यापूर्वी कधी झाली होती अटक? काय होते ते प्रकरण?

राज ठाकरे यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याने त्यांच्या अटकेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज ठाकरे यांना अटक झाल्यास त्याचे राज्यभर पडसाद उमटतील. 2008 सालीही राज ठाकरे यांना अटक करण्यात आली होती.

Updated: May 3, 2022, 04:04 PM IST
Raj Thackarey : राज ठाकरे यांना यापूर्वी कधी झाली होती अटक? काय होते ते प्रकरण?  title=

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackarey ) यांच्या औरंगाबाद ( Aurangabad ) येथील सभेबाबत पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ ( Rajnish seth ) यांनी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आजच कारवाई होईल असे संकेत दिले होते.

औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरे यांनी 4 तारखेला घोषित केलेले हनुमान चालीसा आंदोलन करू नये म्हणून पोलिसांनी 40 मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. हनुमान चालीसा म्हटले तर सामाजिक तेढ निर्माण होईल,अशांतता पसरेल म्हणून कलम 149 अंतर्गत या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.  मनसेचे 3 प्रमुख पदाधिकारी यांना पोलीस आयुक्त कार्यालयात बोलावून या नोटीस देण्यात आल्या.

पोलीस महासंचालक यांची पत्रकार परिषद संपून काही तास उलटत नाही तोच औरंगाबादच्या सीटी चौक पोलीस स्थानकात ( Citi chouk police ) राज ठाकरे यांच्याविरोधात पोलीस उप निरीक्षक गजानन इंगळे यांनी गुन्हा नोंदविला आहे.  कलम ११६, ११७, १५३ भादवि १९७३ सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ सुधारीत ३१ जुलै २०१७ या कलमांतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सभेच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज ठाकरे यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याने त्यांच्या अटकेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज ठाकरे यांना अटक झाल्यास त्याचे राज्यभर पडसाद उमटतील. 2008 सालीही राज ठाकरे यांना अटक करण्यात आली होती.

रेल्वे परीक्षा देण्यासाठी युपी (UP), बिहार (Bihar)  येथील अनेक उमेदवार मुंबईत दाखल झाले होते. त्यावेळी लालूप्रसाद यादव (Laluprasad Yadav)हे रेल्वेमंत्री होते. त्यांनी आकसाने या परीक्षेतून मराठी उमेदवारांना डावलले असा आरोप करून मनसेने त्याविरोधात आंदोलन छेडले.

या आंदोलनादरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाण केली. खळळ खट्याक आंदोलन झाले. त्याचे पडसाद दिल्लीत उमटले. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख ( VIlasrao Deshmukh ) आणि गृहमंत्री आर. आर. पाटील (R.R.Patil) यांनी पोलिसांना तत्काळ कारवाईचे आदेश दिले.

पोलिसांनी गुन्हा नोंद केला आणि कोर्टाने राज ठाकरे यांच्या अटकेचे आदेश काढले. त्यावेळी राज ठाकरे रत्नागिरी येथे होते. १९ ऑक्टोबर २००८ रात्रीचे पावणे तीन वाजले होते. पोलिसांनी त्यांना रात्रीच अटक केली आणि रातोरात त्यांना बांद्रा येथे आणण्यात आले.

राज ठाकरे यांना अटक झाल्यानंतर महाराष्ट्रात आगडोंब उसळला. राज यांना दुसऱ्या दिवशी सकाळी कल्याण कोर्टात (Kalyan Court) हजर करण्यात आलं. कोर्टाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांनी जामिनासाठी अर्ज केला आणि त्यांचा जामीन अर्ज लगेच मंजूरही झाला.

मनसेच्या याच आंदोलनामुळे पुढे झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे १३ आमदार निवडून आले.