मुंबई : मान्सून गोव्यात पोहोचला असला, तरी मुंबईत रात्री आणि सकाळी रिमझिम पाऊस झाला. मुंबईच्या आकाशात आज सकाळपासूनच काळ्याकुट्ट ढगांनी गर्दी केली होती, त्यामुळे मुंबईकरांना ऊकाळा देणाऱ्या सूर्याचं दर्शन झालं नसलं, तरी रिमझिम पावसामुळे तरी मुंबईच्या वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मुंबईकरांसाठी हा तसा पहिला पाऊस म्हणता येईल, अचानक आलेल्या पावसाने मुंबईकरांना ऑफिस गाठण्यात जरा उशीरच झाला.
उकाळ्यामुळे घामांच्या धारांनी न्हावून निघणारा मुंबईकर आज पावसाने भिजला. या दरम्यान काही वेळेपर्यंत मुंबईच्या लोकल ५ ते १० मिनिटं उशीराने धावत होत्या. मुंबई, नवी मुंबईतही रिमझिम पाऊस झाला. दक्षिण मुंबईत देखील रात्री पाऊस झाला होता, नेहमीप्रमाणे परळच्या सखल भागात पाणी साचलं, पण पावसाने अवघ्या २५ ते ३० मिनिटांनी आवरतं घेतल्याने, जास्त ठिकाणी पाणी साचू शकलं नाही.
मुंबईकरांनी घरातून निघताना नेहमी छत्री सोबत ठेवणे आवश्यक आहे, अनेक वेळा छत्री नसल्याने रेल्वे प्लॅटफॉर्मवर गर्दी होते, आणि चेंगराचेंगरीसारख्या घटना घडतात. करी रोड स्टेशनवर पोलिसांकडून ज्यांच्याकडे छत्र्या आहेत, त्यांनी स्थानकावर थांबू नये अशी विनंती केली जात होती.