मुंबई : तुम्ही लोकलनं रोज प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण तुमचा मासिक अथवा वार्षिक प्रवासी पास हरवला किंवा चोरी झाला तर तक्रार करुन किंवा हेलपाट्या मारुनही डुप्लीकेट पास मिळणार नाही. भूषण कुलकर्णी या प्रवाशाला हा धक्कादायक अनुभव आला आहे.
लोकलची गर्दी आणि धक्के खात चाकरमानी पोटाची खळगी भरण्यासाठी रोज प्रवास करतो.. महिन्याभरच्या खर्चाचं गणित आखत रोज तिकिट काढणं परवडत नसल्याने मासिक अथवा वार्षिक प्रवासी पास काढतो. मात्र हा प्रवासी पास हरवला अथवा पाकिट चोरीत गेला तर...असाच धक्कादायक अनुभव भूषण कुलकर्णी यांना आला..६ एप्रिल रोजी दादरवरून रात्री साडे नऊच्या सुमारास विरार ट्रेन पकडताना त्यांचं पाकिट चोरट्यांनी मारलं. ही बाब लक्षात येताच त्यांनी रेल्वे पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यांचा पाकिटात पॅन कार्ड, आधार कार्ड, वाहन परवाना, बँक एटीएम आणि रेल्वेचा त्रैमासिक प्रवासी पास होता. तक्रार नोंदवल्याच्या दोन दिवसांनी त्यांना गहाळ झालेली कागदपत्रं मिळाली. मात्र रेल्वे प्रवास तितका मिळाला नाही.
त्यानंतर डुप्लिकेट पाससाठी त्यांनी तिकीट खिडकी गाठली. फी आकारुन मला माझा पास द्या अशी विनंती भूषण यांनी तिकिट खिडकीवर केली. मात्र रेल्वेमध्ये अशी सोय नसल्याचं सांगत तुमचा पास वाया गेला, आता पुन्हा पैसे भरुन नवा पास काढा असे उत्तर भूषण यांना मिळाले. याबाबत भूषण यांनी रेल्वेमंत्र्यांनाही ट्विटरद्वारे माहिती दिली. त्याचबरोबर माहितीच्या अधिकारातून पासची माहिती मागितली. डेबिट कार्डने पैसे भरल्याचा पुरावा जोडला. त्यानंतर मिळालेल्या माहितीत भूषण यांना धक्कादायक बाब समोर आली..
'माहिती अधिकारात मला या विभागाकडून त्या विभागाकडे नाचवलं. मात्र पास काही मिळाला नाही..उलट डुप्लीकेट पासची तरतूद नसल्याचं समोर आलं. माझे तीन महिन्यांचे पैसे वाया गेल्याची' खंत भूषण यांनी 'झी 24 तास'कडे बोलून दाखवली. या सर्व प्रकारानंतर भूर्दंड सोसून भूषण यांनी नवा पास काढला. मात्र प्रश्न काही सुटला नाही.