दाऊद इब्राहीमला जोरदार धक्का, आईची शेवटची आठवणही हातून जाणार

कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहीमच्या अडचणी वाढणार आहेत. दाऊदची आणखी एक प्रॉपर्टी सील करण्याची तयारी करण्यात येतेय. मात्र, यावेळी केंद्र सरकार नाही तर मुंबई महापालिका हे काम करणार आहे. 

Updated: Mar 20, 2018, 03:00 PM IST
दाऊद इब्राहीमला जोरदार धक्का, आईची शेवटची आठवणही हातून जाणार title=

अंकूर त्यागी, झी मीडिया, मुंबई : कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहीमच्या अडचणी वाढणार आहेत. दाऊदची आणखी एक प्रॉपर्टी सील करण्याची तयारी करण्यात येतेय. मात्र, यावेळी केंद्र सरकार नाही तर मुंबई महापालिका हे काम करणार आहे. 

दाऊदची आई 'आमना'च्या नावे बनवण्यात आलेल्या शॉपिंग सेंटरचा प्रॉपर्टी टॅक्स १९९६ पासून भरण्यात आलेला नाही. १ कोटी २५ लाख ८७ हजारांचा हा प्रॉपर्टी टॅक्स भरलेला नाही. त्यामुळे बीएमसी ही मालमत्ता सील करणार आहे. 

ही ईमारत सर्व सामान्य नाही. दाऊदच्या ढासळत्या साम्राज्याचं हे प्रतिक आहे... आमना शॉपिंग सेंटर... दाऊदच्या आईच्या नावावरून या शॉपिंग सेंटरचं नाव ठेवलं गेलं. मात्र, आता या ईमारतीवर मुंबई महापालिका कारवाई करणार आहे. १९९६ पासून आजतागायत या इमारतीचा प्रॉपर्टी टॅक्स भरण्यात आला नाही. 

ही इमारत हाजी उस्मान हाजीच्या नावे रजिस्टर झालीय. इथे आधी एक आईस फॅक्टरी होती. मात्र त्यानंतर इथे अनेक दुकानं उघडली गेली. वारंवार नोटीसा पाठवूनही प्रॉपर्टी टॅक्स भरला गेला नाही. बीएमसीने शनिवारी ४८ तासांची मुदत देत अखेरची नोटीस पाठवली. सोमवारी या मुदतीची अखेर झाली. त्यामुळे आता बीएमसी कारवाईसाठी सरसावलीय. 

दाऊदच्या सारा सहारा मॉलपासून अगदी हाकेच्या अंतरावर ही इमारत आहे. येत्या ७ ते १० दिवसात या इमारतीवर जप्तीची कारवाई होईल. दाऊदचा भाऊ इकबाल जेलमध्ये गेल्यामुळे आता ही प्रॉपर्टी जप्त होण्यापासून वाचवेल असा कोणीही नाही. 

याआधी भारत सरकारने दाऊदची सर्व संपत्ती शत्रू मालमत्ता कायद्यात आणून जप्त करायला सुरूवात केलीय. याआधी दाऊदचा धाकटा भाऊ इकबाल कासकरची मालमत्ताही सील करण्यात आलीय. आता, आईची शेवटची आठवण असलेली संपत्तीही हातून जाणार... मात्र, बीएमसीने पहिल्यांदाच दाऊदची मालमत्ता सील करण्याची तयारी केलीय हे विशेष आहे...