'नाईट लाईफ'मुळे पोलिसांवर प्रचंड ताण येईल- आशिष शेलार

निवासी भागांमधील हॉटेल्स २४ तास सुरू राहणार असतील तर भाजपचा त्याला विरोध आहे.

Updated: Jan 18, 2020, 05:16 PM IST
'नाईट लाईफ'मुळे पोलिसांवर प्रचंड ताण येईल- आशिष शेलार title=

मुंबई: मुंबईतील हॉटेल, पब्स, मॉल्स आणि थिएटर सुरु ठेवण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयाविरोधात भाजपने बंडाचे निशाण फडकावले आहे. रात्रीच्यावेळी बार, लेडीज बार आणि डिस्को सुरु राहिले तर पोलिसांवरील ताण आणखीन वाढेल, अशी भीती भाजप नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केली. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

यावेळी त्यांनी म्हटले की, अमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स व्यासपीठांमुळे राज्यातील व्यापाऱ्यांवर अगोदरच आक्रमण झाले आहे. सरकारच्या निर्णयाने लहानसहान व्यापाऱ्यांना फायदा होत असेल तर या निर्णयाला आमचा पाठिंबाच आहे. मात्र, निवासी भागांमधील हॉटेल्स २४ तास सुरू राहणार असतील तर भाजपचा त्याला विरोध आहे. कारण सर्वसामान्य लोकांना नोकरदार लोकांना झोप आवश्यक आहे. निवासी भागातील लोकांना या निर्णयाचा त्रास होऊ नये अशी भाजपची भूमिका आहे.

दुकाने आणि मॉल्स २४ तास सुरु राहिल्याने पोलिसांवरील ताण वाढेल. पोलिसांना संपूर्ण रात्र काम करावे लागेल. तसेच वाहतूक पोलीस आणि प्रशासनावरील ताणही वाढेल. त्यामुळे संपूर्ण चौकटच विस्कळीत होईल, असे आशिष शेलार यांनी म्हटले.  

२६ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून मुंबईतली रेस्टॉरंट, मॉल्स, मल्टिप्लेक्स प्रायोगिक तत्वावर सुरू ठेवण्यात येतील. आदित्य ठाकरेंचा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. आहार संघटनेनं नाईट लाईफच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. यामुळे रोजगार वाढतील, अशी प्रतिक्रिया आहार संघटनेचे अध्यक्ष निरंजन शेट्टी यांनी दिली.