महाराष्ट्रातली राष्ट्रपती राजवट आणि शरद पवार...

महाराष्ट्रात काही घडलं तरी त्यात शरद पवारांचा हात असतो, असं म्हटलं जातं...

Updated: Nov 13, 2019, 07:23 PM IST
महाराष्ट्रातली राष्ट्रपती राजवट आणि शरद पवार... title=

मुंबई : महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर एक समीकरण विशेष चर्चेत आलं... ते म्हणजे तीनही वेळा यामध्ये एक नाव समान होतं, ते म्हणजे शरद पवार... पाहुयात काय आहे हे पवार आणि महाराष्ट्रातल्या राष्ट्रपती राजवटीचं समीकरण...

महाराष्ट्रात काही घडलं तरी त्यात शरद पवारांचा हात असतो, असं म्हटलं जातं. खरं-खोटं पवारच जाणोत, पण गेली चार दशकं वारंवार होणाऱ्या या चर्चेत आणखी एक भर पडलीय... ती म्हणजे राज्यात आतापर्यंत तीन वेळा लागू झालेल्या राष्ट्रपती राजवटीमध्ये पवारांचा संबंध होताच.

महाराष्ट्रात १९८० साली पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट इंदिरा गांधी पंतप्रधान असताना लागू करण्यात आली होती, ती शरद पवारांचं पुलोद सरकार बरखास्त करून.... तेच पुलोद सरकार जे पवारांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खूपसून बनवलं होतं, ही गोष्ट आजतागायत चर्चिली जाते. काँग्रेस फोडून आणि वेगवेगळ्या पक्षांना एकत्र घेऊन पवारांनी पुलोद सरकार बनवलं होतं. इंदिरा गांधी सत्तेवर येताच त्यांनी ते बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू केली.

त्यानंतर तब्बल ३५ वर्षांनी म्हणजे २०१४ साली महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली ती शरद पवारांमुळेच... त्यावेळी विधानसभा निवडणूक जाहीर होताच, पवारांनी पृथ्वीराज चव्हाण सरकारचा पाठिंबा काढल्यानं ती वेळ आली. म्हणजे काँग्रेसनं त्यांचं सरकार बरखास्त केलं होतं, त्याची फिट्टमफाट पवारांनी केली.

...आणि आता तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झालीय त्याला अनेक जण जबाबदार असले, तरी सरकार बनवण्याचा दावा करण्याची शेवटची संधी राज्यपालांनी राष्ट्रवादीला दिली. पण काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीचं त्रांगडं वेळेत सोडवणं पवारांना जमलं नाही आणि शेवटी कसा का होईना, पण पवारांचा त्याच्याशी संबंध जोडला गेलाच. त्यामुळे इतिहासात महाराष्ट्रातल्या राष्ट्रपती राजवटीची चर्चा होईल तेव्हा पवारांचं नाव त्याबरोबर घ्यावंच लागेल...