दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या अडचणी आणखी वाढल्यात. मेहतांच्या उलटसुलट कबुलीजबाबांमुळं कथित एसआरए घोटाळ्याचं गूढ आणखी वाढलंय. त्यातच मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी त्यांनी दाखवलीय.
ताडदेव एमपी मिल कंपाऊंड एसआरए प्रकरण गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांच्या गळ्याशी आलंय. मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून, एसडी कॉर्पोरेशन बिल्डरला करोडोंचा फायदा होईल, असा प्रस्ताव मेहतांनी मंजूर केला, असा आरोप त्यांच्यावर आहे. मेहतांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी रान उठवलं असताना, मुख्यमंत्र्यांनी मात्र त्यांची पाठराखण केली.
पण, झी मीडियाच्या हाती लागलेल्या तीन महत्त्वाच्या पत्रांनी आणखी मोठी पोलखोल केली...
- २३ जून २०१७ ला एसडी कॉर्पोरेशनला अतिरिक्त फायदा मिळवून देण्यासाठी मेहतांनी नियमबाह्य आदेश दिले, पण मीडियात बातम्या झळकल्यावर मुख्यमंत्र्यांनी तो आदेश रद्द केला
- ११ जुलै २०१७ ला गृहनिर्माण विभागानं आदेश स्थगित करण्याचं पत्र एसआरएला पाठवलं
- १३ जुलै २०१७ ला एसआरनं एसडी कॉर्पोरेशनला पत्र पाठवून निर्णय स्थगित केल्याचं कळवलं
आश्चर्याची बाब म्हणजे ही पत्रं कुणी आणि कशी पाठवली? याबद्दल खुद्द प्रकाश मेहताच अंधारात आहेत. खुद्द गृहनिर्माण मंत्र्यांनीच तशी खळबळजनक कबुली 'झी २४ तास'शी बोलताना दिली. 'मुख्यमंत्र्यांनी निर्णयाला स्थगिती दिलेली असतानाही एसआरएनं बिल्डरला पत्र कसं पाठवलं? याबद्दल माहिती नाही, असं प्रकाश मेहतांनी 'झी २४ तास'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. त्या पत्रांबद्दल चौकशीसाठी अधिकाऱ्यांना बोलावलं असल्याचंही मेहतांनी म्हटलंय. त्यामुळं या कथित एसआरए घोटाळ्याचं गूढ आणखी वाढलंय. त्यातच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर गृहनिर्माण खातं सोडेन, अशा शब्दांत मेहतांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवलीय.
बुडत्याचा पाय खोलात असं म्हणतात... तशीच गत प्रकाश मेहतांची झालीय. मेहतांना खरंच मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार का, याकडं आता सर्वांचं लक्ष लागलंय.