युवासेनेच्या नाराजीनंतर पुनम महाजन मातोश्रीवर उद्धव यांच्या भेटीला

...तर युवासेनेचे कार्यकर्ते प्रचारात उतरणार नाहीत

Updated: Mar 31, 2019, 12:19 PM IST
युवासेनेच्या नाराजीनंतर पुनम महाजन मातोश्रीवर उद्धव यांच्या भेटीला title=

मुंबई: उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार पुनम महाजन रविवारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. पुनम महाजन यांच्या प्रचारादरम्यान घडलेल्या एका प्रसंगामुळे युवासेनेचे पदाधिकारी नाराज झाले होते. या पार्श्वभूमीवर पुनम महाजन यांच्या मातोश्री भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

शिवसेना-भाजपची युती झाल्यानंतर राज्यभरात दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकत्रितपणे प्रचार केला जात आहे. युती करतानाच शिवसेनेचा योग्य सन्मान राखला जाईल, याची व्यवस्था मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यामुळे युतीपूर्व काळातही शिवसेनेच्या कोणत्याही टीकेला प्रत्युत्तर न देण्याचे आदेशच मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या नेत्यांना दिले होते. मात्र, उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात लावण्यात आलेला फलक दोन्ही पक्षांमधील वादाचे कारण ठरला आहे. प्रचारासाठी लावण्यात आलेल्या या फलकावर युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचे नाव नव्हते. त्यामुळे युवासेनेचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले. याचा निषेध करण्यासाठी वांद्रे येथे तातडीने युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही झाली. त्यावेळी आदित्य ठाकरे यांचा योग्य सन्मान होईपर्यंत पुनम महाजन यांच्या प्रचारात न उतरण्याचा निर्णय युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतला. उत्तर मध्य मुंबईमध्ये युवासेनेची मोठ्या प्रमाणात ताकद आहे. याचा फटका पुनम महाजन यांना बसू शकतो. त्यामुळे कोणताही दगाफटका टाळण्यासाठी पुनम मातोश्रीवर जाणार असल्याचे कळते.