लोकसभा निवडणूक २०१९ : दलबदलूंचे राजकारण जोरात

लोकसभा निवडणुकीच्या आधी फोडाफोडीचे राजकारण...

दीपक भातुसे | Updated: Mar 28, 2019, 01:50 PM IST
लोकसभा निवडणूक २०१९ : दलबदलूंचे राजकारण जोरात title=

दीपक भातुसे, मुंबई : निवडणुका आल्या की दलबदलूंची लाट सुरू होते. आपला पक्ष सोडून उमेदवारीसाठी दुसऱ्या पक्षाच्या वळचणीला जाणारी अनेक उदाहरणे यंदाच्या निवडणुकीतही पहायला मिळत आहेत. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत जे उमेदवार आहेत त्यांचा इतिहास बघितला तर अनेक उमेदवारांनी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात, तर दुसऱ्या पक्षातून तिसऱ्या पक्षात उडी मारल्याचे दिसते.

पक्षनिष्ठा, विचारधारा, त्याग, कार्यकर्त्यांना न्याय हे राजकारणातील परवलीचे शब्द.. मात्र राजकारणात मोठं होण्यात अडथळा ठरत असतील तर हे शब्द गुंडाळून ठेवले जातात. स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारणात ना विचारधारेला महत्त्व आहे, ना पक्षनिष्ठेला, ना त्यागाला... तर दुसरीकडे पक्षाच्या फायद्यासाठी कार्यकर्त्याला न्याय देण्याची पक्षाची भूमिकाही गुंडाळून ठेवली जात असल्याचं चित्र आहे. सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत याचा प्रत्यय प्रत्येक पक्षात येताना दिसतोय. उमेदवारीसाठी या पक्षातून त्या पक्षात उडी मारणारे कमी नाहीत, हे कमी म्हणून की काय एका पक्षातून दुसऱ्या पक्षात, दुसऱ्यातून तिसऱ्या पक्षात जाणारेही कमी नाहीत. 

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आपल्या पक्षातून तिकीट मिळणार नाही किंवा मतदारसंघ सुटणार नाही म्हणून दुसऱ्या पक्षात उड्या मारलेले अनेक उमेदवार यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यातील अनेक उमेदवारांची घराणी पूर्वी दुसऱ्या पक्षात होती.

भाजप :

१. सुजय विखे-पाटील - नगरमधील भाजपचे उमेदवार आहेत. सुजय विखे-पाटील यांच्या तीन पिढ्या काँग्रेसमध्ये होत्या, सुजयचे वडील आणि आजोबा शिवसेनेकडून राज्यात आणि केंद्रात मंत्रीही होते.

२. प्रताप पाटील चिखलीकर - नांदेडचे भाजपचे उमेदवार मूळ काँग्रेसचे असलेले प्रताप पाटील चिखलीकरांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेकडून ते लोहा-कंधार मतदारसंघातून आमदार आहेत. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून नांदेडमध्ये लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाणांना आव्हान दिलं आहे.

३. भारती पवार - दिंडोरीतील भाजपच्या उमेदवार. भारती पवार यांनी २०१४ साली राष्ट्रवादीकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. तसेच त्यांचे सासरे दिवंगत ए. टी. पवार हे राष्ट्रवादीचे आमदार होते.

४. कांचन कुल - बारमतीच्या भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचे पती राहुल कूल पूर्वी राष्ट्रवादीत होते. २०१४ ची विधानसभा निवडणूक राहुल यांनी महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाकडून लढवली होती. तसेच कांचन कुल यांच्या सासू राष्ट्रवादीच्या आमदार होत्या, तर सासरे काँग्रेसचे आमदार होते. 

५. हिना गावित - नंदुरबारमधून भाजपच्या उमेदवार. हिना गावित यांचे वडील विजयकुमार गावित हे राष्ट्रवादीमध्ये होते. मागील निवडणुकीतच गावित कुटुंबाने भाजपमध्ये प्रवेश केला. हिना गावित यांना भाजपने पुन्हा नंदुरबारमधून संधी दिली आहे.
 
६. संजय काका पाटील - सांगलीचे भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील हे राष्ट्रवादीचे आमदार होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मागील वेळीही त्यांनी भाजपमधून निवडणूक लढवली होती.

शिवसेना :

१. ओमराजे निंबाळकर - उस्मानाबादमधील शिवसेनेचे उमेदवार. ओमराजे निंबाळकर मागील अनेक वर्ष शिवसेनेत आहेत. मात्र त्यांचे वडील पवनराजे पूर्वी काँग्रेसमध्ये होते.

२. संजय मंडलिक - कोल्हापूरमधील शिवसेनेचे उमेदवार. संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक राष्ट्रवादीचे खासदार होते.

३. धनंजय माने - हातकणंगलेचे शिवसेनेचे उमेदवार. धनंजय माने यांच्या आई निवेदिता माने राष्ट्रवादीच्या खासदार होत्या व आजोबा काँग्रेसचे खासदार होते.

४. नरेंद्र पाटील - सातारचे शिवसेनेचे उमेदवार. नरेंद्र पाटील हे पूर्वी राष्ट्रवादीचे आमदार होते. त्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला, आता ते शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

५. राजेंद्र गावित - पालघरमधील शिवसेनेचे उमेदवार. काँग्रेसमध्ये असलेल्या राजेंद्र गावित यांनी पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपात प्रवेश केला. भाजपकडून ते खासदारही झाले. मात्र आता ते शिवसेनेच्या तिकीटावर पालघरमधून रिंगणात आहेत.

काँग्रेस : 

१. सुभाष वानखेडे - हिंगोलीतून काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे हे मूळचे शिवसैनिक आहेत. शिवसेनेतून ते आमदार आणि खासदार होते. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता काँग्रेसमध्ये आले आहेत.

२. नाना पटोले - नागपूरमधून काँग्रेसचे उमेदवार मूळचे काँग्रेसचे असलेले नाना पटोले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०१४ च्या निवडणुकीत भंडारा गोंदियातून ते भाजपकडून खासदारही झाले. मात्र आता ते स्वगृही परतले आहेत.

३. संजय निरुपम - उत्तर-पश्चिम मुंबईतून काँग्रेसचे उमेदवार. मूळचे शिवसेनेचे असलेले संजय निरुपम शिवसेनेला जय महाराष्ट्र करून काँग्रेसमध्ये आले असून गेली अनेक वर्ष ते काँग्रेसमध्ये आहेत.

४. संजय शिंदे - माढ्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे. भाजपाच्या जोरावर जिल्हापरिषदेचं अध्यक्षपद मिळवणाऱ्या संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून माढाची उमेदवारी मिळवली आहे. 

५. रणजितसिंह मोहिते पाटील - कोणत्याही पक्षात नसलेल्या याशिवाय या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीबरोबर असलेल्या सोलापुरातील मोहिते-पाटील घराण्यातील रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे. तर फलटणच्या रणजित निंबाळकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला आहे.

निवडणुकीत आकड्यांना फार महत्त्व असतं. आकडेच सत्तेपर्यंत पोहचवत असतात. त्यामुळे आपल्या पक्षाचा आकडा वाढवण्यासाठी पक्षाची ध्येय धोरणं, विचारधारा सगळें गुंडाळून ठेवलं जातं आणि कुणालाही पक्षात प्रवेश दिला जातो, असं सध्याचं चित्र आहे.

काल धर्मांध आणि जातीयवादी असणारा दुसऱ्या पक्षात गेला की लगेच धर्मनिरपेक्ष होतो. तर धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारणारी जातीयवादी पक्षात जाताना ही धर्मनिरपेक्षेता गुंडाळून खुंटीला टांगून ठेवतात. मतदारांना गृहित धरून सगळे नेते आपलं राजकारण करतात. लोकशाहीची थट्टा करणाऱ्या अशाच लोकांना मतदार निवडून देत असल्याचं चित्र आहे.