मुंबई : दहीहंडीवरुन राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. दहीहंडीवरुन आता शिवसेना विरुद्ध मनसे असं चित्र उभं राहण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहीहंडी साजरी न करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र मनसेने दहीहंडी साजरी करणारंच अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे पोलिसांनी आता दहीहंडीचं आयोजन करणाऱ्या मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवली आहे.
मनसे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांवर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना नियमांचं उल्लंघन,पोलिसांनी बजावलेल्या नोटीसीच उल्लंघन व विनापरवाना स्टेज उभारल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अविनाश जाधव व पदाधिकाऱ्यांची नौपाडा पोलीस ठाण्यातून जामिनावर सुटका करण्यात आली आहे. पण मनसे दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर अजूनही ठाम आहे.
'पोलीस त्यांच्या भूमिकेवर ठाम तर आम्ही पण आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. आम्ही हंडी बांधनारच. हे सरकार हिंदू विरोधी बोगस सरकार आहे. हिंमत असेल तर सरकारने पोलिसांना बाजुला ठेऊन मंडप काढायला या, मग दाखवतो मंडप कसा काढतात ते, आम्ही नारायण राणेंचे कार्यकर्ते नाही राज साहेबांचे कार्यकर्ते आहोत. आम्ही दहीहंडी उत्सव साजरा करणारच.' असं थेट आव्हान त्यांनी सरकारला दिलं आहे.