रेल्वे स्टेशन परिसरात तरूणीला मारहाण करणाऱ्या तरूणास अटक

कुर्ला - नेहरू नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणीला मारहाण करणाऱ्या आरोपी तरुणाला कुर्ला पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. या तरूणावर मारहाण आणि पोस्को कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Updated: Oct 22, 2017, 10:31 AM IST
रेल्वे स्टेशन परिसरात तरूणीला मारहाण करणाऱ्या तरूणास अटक title=

मुंबई : कुर्ला - नेहरू नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणीला मारहाण करणाऱ्या आरोपी तरुणाला कुर्ला पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. या तरूणावर मारहाण आणि पोस्को कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

इम्रान शेख असं या आरोपीचं नाव आहे. १७ ऑक्टोबरला इम्राननं पीडित तरुणीची छेड काढत धारधार शस्त्रानं तिच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली होती. या मारहाणीत तीच्या नाकाचं हाड तुटल्यानं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. एवढा धक्कादायक प्रकार घडूनही पोलिसांनी आरोपी तरुणावर किरकोळ गुन्हा दाखल केला होता. अटक केल्यावर आरोपीला न्यायालयात हजर केलं असता त्याची जामीनावर सुटकाही झाली होती.

तरूणाकडून तरूणाला होत असलेल्या बेदम मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झाली. हे सीसीटीव्ही फुटेज बाहेर आल्यावर प्रसारमाध्यमांनी याबाबत आवाज उठवला. घटनेचे वृत्त प्रसिद्ध होता. पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. घटनेची दखल घेत पोलिसांनी पुन्हा आरोपीला अटक केली. मात्र, अटक करून गुन्हा नोंदविण्यापलीकडे पोलिसांनी कोणतीही कडक कारवाई केली नाही. त्यामुळे पोलिसांनी या गुन्हेगाराला अभय का दिलं? साधा गुन्हा का दाखल केला असे सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

गेले अनेक दिवस मुंबईतील महिला सुरक्षीत नसल्याच्या घटना उघडकीस येत आहे. रेल्वे स्टेशन परिसरात किंवा रेल्वे डब्यात एकट्या असलेल्या महिला पाहून अनेक समाजकंटकांनी महिलांना त्रास दिल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. अनेक महिलांनी रेल्वे पोलिसांकडे याबाबत तक्रारही केली आहे. पोलिसांनी आलेल्या तक्रारीवरून अनेक आरोपींच्या मुसक्याही आवळल्या आहेत. मात्र, इतके होऊनही महिलांना होणाऱ्या त्रासामध्ये घट झाली नाही.