Modi Degree: मोदींच्या डिग्रीवरुन पवार विरुद्ध राऊत? प्रश्न विचारला असता म्हणाले, "मोदींनी स्वत:चा करिश्मा..."

PM Modi Degree Certificate Issue Ajit Pawar Comment: अजित पवारांना पत्रकार परिषदेमध्ये पंतप्रधान मोदींच्या शैक्षणिक पात्रतेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना अजित पवारांनी सुरुवातीला थोड्या चिडलेल्या स्वरातच उत्तर दिलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 3, 2023, 02:04 PM IST
Modi Degree: मोदींच्या डिग्रीवरुन पवार विरुद्ध राऊत? प्रश्न विचारला असता म्हणाले, "मोदींनी स्वत:चा करिश्मा..." title=
Ajit Pawar Sanjay Raut PM Modi

Ajit Pawar On PM Modi Degree Certificate Issue: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शैक्षणिक पात्रतेच्या मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांच्या डिग्रीसंदर्भात केलेल्या मागणीवरुन गुजरात हायकोर्टाने त्यांना 25 हजारांचा दंड ठोठावल्यानंतर शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. मात्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी उघडपणे या डिग्रीच्या वादाऐवजी लोकांशी निगडीत प्रश्नांवरुन प्रश्न उपस्थित करणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. अजित पवार यांनी आपली भूमिका मांडताना अप्रत्यक्षपणे संजय राऊतांच्या भूमिकेविरोधात भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं.

राऊतांचं ट्वीट...

संजय राऊत यांनी आज सकाळी पंतप्रधान मोदींच्या डिग्री सर्टिफिकेटचा फोटो ट्वीट करत मोदींना लक्ष्य केलं होतं. ही क्रांतीकारी आणि ऐतिहासिक डिग्री नवीन संसदभवनाच्या प्रवेशद्वारावर लावावी अशी मागणी राऊत यांनी ट्विटरवरुन केली होती. असं केल्यास कोणी मोदींच्या पात्रतेबद्दल शंका घेणार नाही असा टोलाही त्यांनी लगावला होता. 

अजित पवारांना विचारलं असता ते चिडून म्हणाले...

याचसंदर्भात पत्रकारपरिषदेमध्ये मोदींच्या शिक्षणावरुन सुरु असलेला वाद या विषयावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अजित पवारांनी जरा चिडूनच, "आहो, 2014 ला त्यांची डिग्री पाहून त्यांना निवडून दिलं आहे का?" असा प्रतिप्रश्न पत्रकारांना विचारला. "त्यांनी (मोदींनी) देशात 2014 ला स्वत:चा करिश्मा निर्माण केला. यापूर्वी भाजपाचा हा असा करिश्मा जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत नव्हता. त्याचं सर्व श्रेय मोदींनाच दिलं पाहिजे. डिग्रीवर काय? आधीच्या काळापासून आतापर्यंत जे देशाचे पंतप्रधान किंवा वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री झाले त्यांना आपल्या लोकशाहीमध्ये बहुमताचा आदर करुन निवडण्यात आलं. इथं 543 ची संख्या आहे. त्यात ज्याचं बहुत असेल तो तिथं प्रमुख होतो. आपल्या राज्यात 146 चं ज्याचं बहुमत असेल तो त्या ठिकाणी मुख्यमंत्री होतो," असं अजित पवार म्हणाले.

डिग्रीपेक्षा महत्त्वाचे प्रश्न हे...

राजकारणात शैक्षणिक पात्रता महत्त्वाची नसते असंही अजित पवार म्हणाले. "शिक्षणाच्या बाबतीत एमबीबीएस वगैरे झाल्याशिवाय डॉक्टर म्हणून काम करु शकत नाही पण असं काही राजकारणात नाही. त्यामुळे ते 9 वर्ष तुमच्या, माझ्या देशाचं प्रतिनिधित्व करतात. आता डिग्रीचं काढून काय होणार. मी अनेकदा बघतो मध्येच पंतप्रधानांच्या डिग्रीचा विषय काढला जातो. मंत्र्यांच्या डिग्रीचा विषय काढला जातो. तो महत्त्वाचा प्रश्न आहे का? नाही महागाई आणि बेरोजगारीचा प्रश्न महत्त्वाचा आहे. महागाईचा आगडोंब उसळलेला आहे. त्याबद्दल बोलायचं नाही, चर्चा करायची नाही. सगळी मुलं मुली आम्हाला कधी नोकऱ्या मिळणार विचारत आहेत. 75 हजारांची भरती होणार होती वेगवेगळ्या विभागांमध्ये त्याचं काय झालं? ते सोडून हा काय विषय चर्चेत आहे? शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कामगारांचे प्रश्न आहेत. त्यामुळे त्या गोष्टींना (डिग्री वादाला) महत्त्वं त्यावं असं आम्हाला अजिबात वाटत नाही," असं अजित पवारांनी सांगितलं.

मुघलांच्या इतिहासावरुनही टोला...

मुघलांचा इतिहास अभ्यासक्रमातून काढून टाकला आहे. या विषायवरुन बोलताना अजित पवार यांनी, "आपण देशाला का मागे मागे घेऊन चाललो आहे. अभ्यासक्रमातून बाहेर काढलं तरी इतिहासात नोंद कायमची राहणार आहे ना? जो इतिहास आहे तो आहे. त्याला घाबरायचं काय आहे. आपण कुठल्या विचारसणीमध्ये जातो, काय करतो. मला तर काही कळत नाहीय," म्हटलं.