मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या भलतेच फॉर्मात आहेत. व्यंगचित्रातून आपल्या भावना, आपली मतं ते लोकांपर्यंत पोहचवण्यात यशस्वी होत आहेत.
'मराठी भाषा दिना' निमित्तानं राज ठाकरेंच्या मनात काय विचार आले, हेही त्यांनी आपल्या एका नव्या व्यंगचित्रातून समोर मांडलंय. या चित्रासोबत 'कालच मराठी राजभाषा दिन झाला, त्यानिमित्त मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि देशातल्या इतर भाषिक आणि प्रांतिक अस्मिता याच्यावर एक व्यंगचित्र सुचलं होतं. काल ते पूर्ण होऊ शकलं नाही, पण आज ते इथे प्रसिद्ध करतोय. नक्की पहा आणि विचार करा. मराठी अस्मिता ही जातींच्या पलीकडे जायला हवी हीच इच्छा...' असंही त्यांनी फेसबुकवर म्हटलंय.
नुकतेच, पुण्यात झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही काही प्रश्न विचारुन त्यांनाही अडचणीत आणण्याचा प्रयत्नही राज ठाकरे यांनी केला होता... आणि यात ते काही प्रमाणात यशस्वीही ठरले होते. महाराष्ट्राकडे पाहताना, ज्याचं नाव घेतल्यावर सर्व समाजातील लोक एकत्र येतील असा महाराष्ट्राचा 'हूक' काय वाटतो, या राज ठाकरेंच्या प्रश्नावर 'छत्रपती शिवाजी' असं उत्तर द्यायला शरद पवारांना वेळ लागला नाही. त्यावर पवारांना मध्येच थांबवत 'ज्यावेळी आपण भाषणाला उभे राहता त्यावेळी शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणता... त्याऐवजी शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र का म्हणत नाही? असा प्रश्न विचारत राज ठाकरेंनी पवारांना पेचात पकडण्याचा प्रयत्न केला होता.
त्याचसोबत शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, सावरकर, आंबेडकर या महापुरुषांकडेही मराठी माणूस जातीने पाहतो, हे बदलणं गरजेचं वाटत नाही का? जातीजातीमध्ये जो कडवटपणा आलाय तो दूर करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? असा प्रश्न राज ठाकरेंनी पवारांना केला. यावर, तरुणांमध्ये मराठी अस्मिता आणि राष्ट्रीय अस्मिता बिंबवली गेली पाहिजे, असं उत्तर शरद पवार यांनी दिलं होतं.