अंधांसाठी 'स्नेहांकित' ठरलेली परिताई अनेकांची प्रेरणा

स्वत: अंध असूनही अनेक अंधांना आत्मनिर्भर बनवणाऱ्या... एअर एंडिआतून निवृत्त होत आपल्या 'स्नेहांकित' हेल्पलाईन संस्थेचं काम सांभाळणाऱ्या आणि हिमालयातही आपला झेंडा फडकवणाऱ्या परिमाला भट्ट यांच्या प्रेरणादायी प्रवासाची ही कहाणी...

Updated: Jul 14, 2017, 10:39 PM IST
अंधांसाठी 'स्नेहांकित' ठरलेली परिताई अनेकांची प्रेरणा  title=

मुंबई : स्वत: अंध असूनही अनेक अंधांना आत्मनिर्भर बनवणाऱ्या... एअर एंडिआतून निवृत्त होत आपल्या 'स्नेहांकित' हेल्पलाईन संस्थेचं काम सांभाळणाऱ्या आणि हिमालयातही आपला झेंडा फडकवणाऱ्या परिमाला भट्ट यांच्या प्रेरणादायी प्रवासाची ही कहाणी...

वांद्रेमध्ये राहणाऱ्या परिमाला भट्ट यांचा कामाचा उरक इतका आहे की कधी एकदा घरातली काम आटोपून सामाजिक कार्यासाठी स्वत:ला वाहून टाकतात हे त्यांचं त्यांनाही कळत नाही... आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे परिमाला ताईंना लहानपणापासूनच अंधत्व आहे असं जर तुम्हाला सांगितलं तर नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटेल... इतका सहज त्यांचा वावर सर्वत्र असतो.

एकदा त्या परिसराची, आजूबाजूची माहिती कळली की त्यांना दुसऱ्यांची मदत कधीच लागत नाही... आणि म्हणूनच अंधत्वाचं दु:ख कधी त्यांना जाणवलंच नाही. लहान पणापासून शिक्षकी पेशातली आई आणि पत्रकारितेतल्या बाबांकडून शिस्त, धडाडी, कोणत्याही कामात कंटाळा न करण्याची सवय परिताईंना लागली... आणि मग बीए, एमएसडब्ल्यूची पदवी, नॅबच्या मिटिंगसाठी परदेश दौरे सगळं काही परिमाला ताईंनी धडाडीने केलं.

अंध महिला विकास समितीच्या सचिव, नॅब संस्थेची राष्ट्रीय स्तरावरची सेक्रेटरी आणि महिला विभाग प्रमुख ही पदं सांभाळता सांभाळता एअर इंडियातली सोशल वर्कर म्हणून नोकरीही केली. इतकं कमी म्हणून की काय शेवटी स्वत:ची 'स्नेहांकित' ही अंधाच्या मदतीसाठी संस्थाही स्थापन केली.

वेळ वाया न घालवता नवनवी आव्हानं पेलणाऱ्या परिमाला ताईंनी हिमालयात १७ हजार फूटांवरच्या शिखरावर झेंडा लावून 'पहिली महिला अंध गिर्यारोहक' होण्याचा मानही पटकावला. अप-टू डेट राहणं, नव्या तंत्रज्ञानाबाबत स्वत:ला अपडेट ठेवणं, अफाट वाचन, पद्धतशीर जगणं यामुळे परिमाला ताईंनी वयाने जरी पन्नाशी पार केली असली तरीही त्यांचा उत्साह, कामाचा व्याप हा तरुणांना लाजवणारा असाच आहे. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर आता 'स्नेहांकित' हेल्पलाईनचं काम आणखी जोमाने करण्याचा त्यांचा मानस आहे. परिताईंना त्याच्या या कामाला आमच्या खूप खूप शुभेच्छा...