राज्यात 15 डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरु होणार? पालकांचं मत काय

राज्यात आढळत असलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णांमुळेही पालकांमध्ये भीतीचं वातावरण

BGR | Updated: Dec 10, 2021, 09:00 PM IST
राज्यात 15 डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरु होणार? पालकांचं मत काय title=

मुंबई : राज्यात शहरी भागात येत्या पंधरा तारखेपासून प्राथमिक शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण राज्यातल्या प्राथमिक शाळा 15 डिसेंबरला सुरू होण्याची शक्यता कमीच आहे. ओमायक्रॉनमुळे पालकांचा शाळा सुरू करायला विरोध असल्याची माहिती आहे. 

राज्यात काही ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यानं शाळा सुरू करण्याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे प्राथमिक शाळा पुढच्या वर्षीच सुरू होण्याची शक्यता आहे. शालेय शिक्षण मंत्र्यांनी घाई गडबडीने निर्णय घेतल्याची पालकांची भावना आहे. अजूनही बरेचसे पालक मुलांना शाळेत पाठवायला अनुकूल नाहीत.

देशासह राज्यात आढळत असलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णांमुळेही पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

औरंगाबादमध्ये निर्णय लांबणीवर
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याबाबत आढावा बैठक लांबणीवर टाकण्याचा निर्णय औरंगाबाद महापालिकेने घेतला आहे. 15 तारखेला महापालिका आढावा घेणार आणि त्यानंतर निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. आज महापालिका आढाव बैठक घेणार होती. पण आता हा निर्णय 15 तारखेला घेण्यात येणार आहे.

नागपूरमध्येही 15 तारखेला निर्णय
नागपूर महापालिका मनपा क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याबाबत 15 तारखेला निर्णय घेण्यात येणार आहे.  मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत. कोरोना विषयक परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील आदेश 15 डिसेंबर नंतर जारी करण्यात येतील. मनपा क्षेत्रातील इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग पूर्वीप्रमाणेच सुरु राहतील असंही मनपा आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.

नाशिकमध्ये 15 विद्यार्थ्यांना कोरोना
नाशिकमधल्या मुंढेगाव आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याची धक्कादायकबाब पुढे आली आहे. कोरोना लागण झालेल्या विद्यार्थ्यांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहेत. आदिवासी आश्रमशाळेत 300हून अधिक विद्यार्थी आहेत. यातील 15 विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे. 

राज्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असताना हीबाब पुढे आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यात पहिले ते पाचवीपर्यंतच्या शाळा सुरु करण्याबाबत फेरविचार व्हावा, अशी मागणी होऊ लागली आहे.