मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी ईडी समोर जबाब देताना धक्कादायक खुलासा केला आहे. 100 कोटी कथित वसूली प्रकरणी तुरूंगात असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझेबाबत दिलेल्या जबाबामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
वसूलीचे आरोप असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले होते. परंतू त्यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी थेट तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मोठा दबाव होता. तसेच देशमुख यांना याबाबत पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना होत्या.
मुंबई पोलीस गुन्हे शाखेमध्ये त्यांना सेवेत घ्यावे तसेच महत्वाच्या युनिटचा कारभार देण्याच्या सूचना मला देण्यात आल्या होत्या. अशी माहिती परमबीर सिंह यांनी ईडीला दिली.
मुख्यमंत्री आणि माननीय गृहमंत्री यांच्या सूचनेनुसार CIU कडे काही महत्त्वाची प्रकरणे सोपवण्यात आली होती ज्याचे नेतृत्व सचिन वाझे करीत होते. तसेच सचिन वाझे यांना सेवेत पुन्हा घेण्यासाठी अनिल देशमुख यांनी २ कोटी रुपयांची मागणी केली होती. असा खळबळजनक आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे.