गोपीनाथ मुंडेंच्या हत्येचा दावा, पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

सय्यद सूजा याने गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाल्याचा केला होता दावा

Updated: Jan 23, 2019, 01:51 PM IST
गोपीनाथ मुंडेंच्या हत्येचा दावा, पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया title=

मुंबई : आंतरराष्ट्रीय हॅकर सय्यद शुजा याने मंगळवारी केंद्रीय मंत्री गोपिनाथ मुंडे यांची हत्या झाल्याचा खळबळजनक दावा केला होता. यावर अखेर आज पंकजा मुंडे यांनी झी २४ तासने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देत म्हटलं की, यावर काय बोलावं हा प्रश्न आहे. मी हॅकर नाही. एक कन्या आहे. या सगळ्या गोष्टींचं राजकीय भांडवलं मला करायचं नाही. या सगळ्या प्रकरणामुळे मानसिक त्रासातून कुटुंबियांना जावं लागत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. राजनाथ सिंह यांना मी स्वतः सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. ती पूर्ण झाली आहे. EVM हॅक होऊ शकत नाहीत हे सिद्ध झालं आहे. त्यामुळे या विषयाला आता विराम देऊया असं देखील पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळ्याची माहिती असल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकी सायबर तज्ज्ञाने केला होता. लंडन येथील या पत्रकार परिषदेला काँग्रेस नेते कपिल सिब्बलही हजर होते. यावेळी सय्यद शुजा याने म्हटले की, २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशिनमध्ये फेरफार करण्यात आले होते. यानंतर झालेल्या महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्येही हा प्रकार घडला होता. दिल्लीतील २०१५ मधल्या निवडणुकांतही घोळ होणार होता. परंतु, आम्ही वेळीच दुर्घटना रोखली. अन्यथा ही निवडणुकही भाजपने जिंकली असती असे शुजाने म्हटले होते.

शुजा इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरशन ऑफ इंडिया लिमिटेडचा २००९ ते २०१४ या कालावधीत कर्मचारी होता. त्याने भारतात मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशिन्स डिझाईन केली होती. ग्रेफाईट ट्रान्समीटरच्या मदतीने या ईव्हीएम मशिन्स उघडता येतात. २०१४ मध्ये भाजपने या ट्रान्समीटरचा वापर केला होता. यानंतरच्या काळात माझ्यावर आणि सहकाऱ्यांवर हल्ले झाल्याचेही शुजाने म्हटलं आहे.