'मेट्रो ३'साठी २२३८ झाडे तोडण्याच्या पालिकेच्या निर्णयाला स्थगिती

मेट्रो ३ च्या कारशेडसाठी गोरेगाव पूर्व भागातील 'आरे' भागातील एकूण ३५०० झाडे तोडण्यात येणार आहेत

Updated: Aug 14, 2019, 04:31 PM IST
'मेट्रो ३'साठी २२३८ झाडे तोडण्याच्या पालिकेच्या निर्णयाला स्थगिती title=

मुंबई : 'मेट्रो ३' च्या आरे कारशेडसाठी २२३८ झाडे तोडण्याला मुंबई महानगरपलिकेकडून स्थगिती देण्यात आलीय. मेट्रोकडून २२३८ झाडे तोडण्याचा प्रस्ताव २०१७ साली वृक्ष प्राधिकरण समितीसमोर मांडण्यात आला होता. पण याला विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयात पर्यावरण प्रेमींकडून दाखल करण्यात आली. यावर न्यायालयानं पालिकेला पाहणी करण्याचे तसेच पर्यावरणप्रेमींच्या तक्रारींची दखल घेण्याचे आदेश दिले होते.

महत्त्वाचं म्हणजे मेट्रो ३ च्या कारशेडसाठी गोरेगाव पूर्व भागातील 'आरे' भागातील एकूण ३५०० झाडे तोडण्यात येणार आहेत. यातील २२३८ झाडे तोडण्याचा प्रस्ताव शासनाने वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मांडला होता.  याबाबतीत मुंबई पालिकेनं मुंबईकरांकडून हरकती-सूचनाही मागवल्या होत्या. या प्रकरणी तब्बल ५० हजारांहून अधिक आक्षेप नोंदवण्यात आल्याने मुंबई महानगरपालिकेकडून वृक्ष तोडीचा निर्णयाला स्थगिती देण्यात आलीय. 

येत्या २० ऑगस्ट रोजी वृक्ष प्राधिकरण आणि वरिष्ठ अधिकारी या जागेची पाहणी करणार आहेत. त्यानुसारच निर्णय घेण्यात येईल, असं स्थायी समितीकडून स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे वादात अडकलेले मेट्रो कारशेडचे काम आणखी लांबणीवर जाणार आहे.