मुंबई : पद्मावतचं महाराष्ट्रात काय होणार, याचं उत्तर मिळालंय. संपूर्ण पोलीस संरक्षणात पद्मावत प्रदर्शित होणार आहे. मुख्यमंत्र्यांनीच हे स्पष्ट केलंय. पण तरीही करणी सेनेनं विरोध करण्याची जय्यत तयारी केलीय. तर दुसरीकडे राजस्थान आणि मध्य प्रदेश ही दोन्ही राज्यं पद्मावतच्या प्रदर्शनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात गेलीयत. पाहुया पद्मावतची सद्यस्थिती काय आहे.
पद्मावत अखेर महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. पद्मावत पोलीस संरक्षणात प्रदर्शित होणार असल्याचं खुद्द मुख्यमंत्र्यांनीच स्पष्ट केलं आहे. सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे, त्यामुळे हा सिनेमा महाराष्ट्रात जिथे प्रदर्शित होईल, त्या थिएटरला संरक्षण देऊ, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी दावोसला रवाना होण्यापूर्वी मांडली होती.
सर्वोच्च न्यायालयाने सिनेमा प्रदर्शित करा, असे आदेश दिल्यानंतर आणि सेन्सॉर बोर्डाला सुचवलेले बदल निर्मात्यांनी अंमलात आणले असले तरी राजपूत संघटनांचा या सिनेमाला विरोध कायम आहे. चित्रपटावर बंदी घातली नाही, तर प्रजासत्ताक दिनावर बहिष्कार घालणार असल्याचा इशारा राजपूत करणी सेनेनं दिलाय. चित्रपट प्रदर्शित होतोय, त्या 25 जानेवारीला भारत बंदची हाकही करणी सेनेने दिलीय. सिनेमाच्या प्रदर्शनाविरोधात करणी सेनेनं पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
महाराष्ट्रात पद्मावत प्रदर्शित होणार असला तरी राजस्थान आणि मध्यप्रदेश सरकारनं पुन्हा एकदा पद्मावत विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय. या दोन राज्य सरकारांनी सिनेमॅटोग्राफ्री कायद्याचा हवाला देऊन प्रदर्शनाला विरोध केलाय.
सिनेमॅटोग्राफी कायद्याच्या कलम 6 अंतर्गत राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असेल,तर प्रदर्शनाला बंदी घालण्याचा अधिकार स्थानिक सरकारला आहे, अशी या दोन्ही सरकारची भूमिका आहे. यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे तीन दिवस उरले असले तरी भन्साळींसाठीचं अग्निदिव्य अजूनही कायम आहे.