विरोधकांची टोपी भुजबळांच्या डोक्यावर

ओबीसी आरक्षणावरून आज विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरले. काल राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी आज ओबीसी आरक्षणावरून सरकारला सहकार्य करण्याची भूमिका घेतली.

Updated: Mar 4, 2022, 07:20 PM IST
विरोधकांची टोपी भुजबळांच्या डोक्यावर title=

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने काल ओबीसी आरक्षण पुन्हा फेटाळून लावल्याचे पडसाद आज विधानसभा सभागृहात उमटले. विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांनी ओबीसी बचाव अशा टोप्या घातल्या होत्या. तशीच टोपी मंत्री छगन भुजबळ सभागृहात घालून आले होते. त्यामुळे भुजबळ यांच्या टोपीची चर्चा सभागृहात होती. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळ यांना उद्देशून 'आपण टोपी घातली, पण त्यांना टोपी घालू देऊ नका.'असा चिमटा काढला. राज्यातली एकही निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ देऊ नका, अशी मागणी त्यांनी केली. 

मध्यप्रदेशात निवडणूका घेण्याचे अधिकार राज्य सरकारला आहे. त्याचपद्धतीने राज्यसरकारने मंत्रीमंडळात ठराव आणून कायदा करावा. ओबीसीसह पुढील काळात निवडणूका घेण्यात याव्या. अशी मागणी त्यांनी केली. 

त्यावर, मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, फडणवीसजी यांनी काल सुप्रीम कोर्टात काय झालं, त्यावर आपलं मत मांडलं. त्यांचं स्वागत करतो. ओबीसींच्या पाठीमागे मजबुतीनं उभे आहात, ही चांगली बाब आहे. म्हणून भाजपच्या एका भगिनीनं ओबीसी वाचवा टोपी घालून दिली, मी ती लगेचच घातली.

तसेच, ओबीसी आरक्षणावर तुमचा ‘वाचवा’ शब्द आहे. तो ‘बुडवा’ होईल, असं काही करू नका, असा टोला मंत्री भुजबळ यांनी फडणवीस यांना लगावला.