'मुख्यमंत्र्यांनी थोडे खंबीर निर्णय घेणे अपेक्षित'

आम्हाला सरकार बनवण्यात कोणतीही घाई नाही.

Updated: May 26, 2020, 06:06 PM IST
'मुख्यमंत्र्यांनी थोडे खंबीर निर्णय घेणे अपेक्षित' title=

मुंबई : विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ऑनलाईन पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकारमध्ये समन्वय नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये स्पष्ट केलं आहे. तसेच अंतर्गत विरोधानं सरकार पडेल, असं म्हणत महाविकासआघाडी सरकारवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी खूप महत्वाचे आणि बोल्ड निर्णय घेणं अपेक्षित आहे, असं विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलंय. 

देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनावर जाण्यामुळे होणाऱ्या टीकांवर उत्तर दिलं आहे. राज्यपाल शोभेची वस्तू नाहीत किंवा कटपुतली नाही. त्यांना संवैधानिक अधिकार आहेत. शिवसेनेनं सरकारमध्ये असतांना कर्जमाफीचं निवेदन राज्यपालांना दिले होते तर आम्ही आता गेलो तर हरकत काय? मुख्यमंत्र्यांना सांगून काम होणार असेल तर राज्यपालांकडे जाण्याची वेळच येणार नाही, असं देखील ते यावेळी म्हणाले. (केंद्राची प्रतिमा मलीन केली जात आहे - देवेंद्र फडणवीस) 

आम्हाला सरकार बनवण्यात कोणतीही घाई नाही. सध्या आमचा फोकस हा कोरोनाच्या लढाईत आहे. आता नारायण राणे यांनी राजवटीचा मुद्दा पुढे आणला ते त्यांच वैयक्तिक मत आहे. ते भाजपचं मत नाही, असंही फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं. तसेच राज्य सरकारच्या गरजा या वेगळ्या आहेत. त्यांच्यामध्ये समन्वय नाही हे त्यांच्या कामातून स्पष्ट झालं आहे. 

उद्धव ठाकरेंच मूल्यमापन मी करणार नाही. राज्याला निर्णय घेणं गरजेचं आहे. कधी गोड बोलून निर्णय घ्यावे लागतात. काही वेळेला निर्णय चुकतात. तेव्हा टीका देखील होते. पण खंबीर निर्णय घेणं गरजेचं आहे, असं फडणवीस म्हणाले.