मुंबई: काही दिवसांपूर्वी राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून कुख्यात झालेल्या धारावीतील Dharavi कोरोना व्हायरसचा Coroanvirus प्रादुर्भाव आता जवळपास नियंत्रणात आल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण, मंगळवारी धारावीत केवळ एका नव्या रुग्णाची नोंद झाली. त्यामुळे आता धारावी परिसरावरील कोरोनाचे गंडांतर दूर झाल्याचे दिसत आहे. आतापर्यंत धारावीत कोरोनाचे २३३५ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ३५२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर १७३५ जण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत.
मार्च महिन्यात महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार व्हायला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात धारावी हा मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. याठिकाणी अत्यंत दाटीवाटीची वस्ती असल्याने धारावीत मोठी मनुष्यहानी होईल, अशी भीती वर्तविली जात होती. मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांत धारावीत दररोज मोठ्या संख्येने रुग्ण सापडत होते. त्यामुळे सर्वांनाच धडकी भरली होती. मात्र, यानंतर मुंबई महानगरपालिका, पोलीस आणि आरोग्य यंत्रणेने धारावी केलेल्या आक्रमक उपाययोजनांमुळे धारावी परिसरातील कोरोनाचा प्रभाव ओसरायला सुरुवात झाली होती.
1 new #COVID19 case reported in Dharavi area of Mumbai today. Total number of cases in the area is now at 2335, including 352 active cases & 1735 discharges: Brihanmumbai Municipal Corporation pic.twitter.com/F8H9k19Nis
— ANI (@ANI) July 7, 2020
गेल्या काही दिवसांत धारावीतील कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली. अखेर आज धारावीत कोरोनाचा केवळ एकच नवा रुग्ण आढळून आला. मात्र, धारावीपासून काही अंतरावर असणाऱ्या दादर आणि माहीममध्ये अजूनही कोरोनाचे बऱ्यापैकी रुग्ण सापडत आहेत. मंगळवारी दादरमध्ये २० तर माहीममध्ये १९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. मात्र, पूर्वीपेक्षा या भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याचे चित्र आहे.
दरम्यान, आज महाराष्ट्रात कोरोनाच्या ५१३४ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर २२४ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २,१७, १२१ वर जाऊन पोहोचला आहे.