मुंबई : मुंबईची लाईफलाईन सामान्य जनतेसाठी कधी सुरु करण्यात येणार ? यावर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता बाकी सर्वांना मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.
कोरोनामुळे लोकलवर लादलेले हे निर्बंध कधी उठवले जाणार, हा प्रश्न कळीचा बनला आहे. यावर मंत्री वडेट्टीवार यांना विचारले असता त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत केली आहे.
राज्यात सध्या कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली असली तरी राज्य कोरोनामुक्त झालेले नाही. दैनंदिन रुग्णसंख्या आजही मोठीच आहे. पहिल्या लाटेत दैनंदिन रुग्णसंख्येचा जो उच्चांक होता, तिथे येऊन रुग्णसंख्या स्थिरावली आहे. 10 हजाराच्या आसपास दररोज नवे रुग्ण आढळत आहेत.
एकीकडे दुसरी लाट पूर्णपणे ओसरलेली नसताना तिसरी लाट येण्याची शक्यताही बळावत चालली आहे. या सगळ्याच बाबींचा विचार करण्याची गरज असून कोणत्याही निर्बंधांबाबत निर्णय घेताना ही स्थिती लक्षात घ्यावी लागणार असल्याचं वडेट्टीवार यांनी नमूद केले.
पुढे वडेट्टीवार म्हणाले, "लोकल ट्रेनबाबत कोणताही निर्णय विचारपूर्वकच घ्यावा लागणार आहे आणि जो काही निर्णय असेल तो स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तज्ज्ञांशी व संबंधितांशी चर्चा करून घेणार आहेत.
दर शुक्रवारी राज्यातील कोरोना स्थितीचा टास्क फोर्स मार्फत आढावा घेतला जातो. त्यानंतर त्याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली जाते व त्याआधारे पुढील निर्णय घेतले जातात.
दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुका आहे त्या स्थितीत स्थगित केल्या आहेत. या निर्णयाचे वडेट्टीवार यांनी स्वागत केले. आयोगाने निवडणुकीला दिलेली स्थगिती हे कुणाचे यश वा अपयश नाही तर, सर्व ओबीसींचे यश आहे. यात मुख्यमंत्र्यांनी पूर्ण सहकार्य केले.